शहादा, जि. नंदुरबार : शहादा शहरातील बसस्थानक परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी व चिखल साचत असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बसमध्ये चढताना व उतरताना नागरिकांना साचलेल्या पाण्यातून आणि चिखलातून मार्ग काढावा लागत असल्याने प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या समस्येमुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच दररोज बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बसस्थानक हे शहरातील महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाण असून येथे स्वच्छता, पाण्याचा निचरा आणि सुरक्षित प्रवासी व्यवस्था असणे आवश्यक आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता प्रशासनाचे या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्याचे राज्य उपाध्यक्ष मा. गणेश खर्डे यांनी मुख्यमंत्री कार्यालय, जिल्हाधिकारी, शहादा नगरपालिका तसेच एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
बसस्थानक परिसरातील पाण्याचे खड्डे तातडीने बुजवावेत, चिखल व अस्वच्छता साफ करावी, पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था करावी, प्रवाशांना सुरक्षितपणे बसमध्ये चढता-उतरता यावे यासाठी पेव्हर ब्लॉक किंवा सुरक्षित मार्गाची व्यवस्था करावी तसेच बसस्थानकाची नियमित स्वच्छता व देखभाल करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
“संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष बसस्थानकाची पाहणी करून नागरिकांच्या या गंभीर समस्येवर तातडीने तोडगा काढावा. केवळ तात्पुरती डागडुजी न करता पावसाळ्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास नागरिकांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा मा. गणेश खर्डे यांनी दिला आहे.
— मा. गणेश खर्डे
राज्य उपाध्यक्ष, बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य


0 Comments