रस्त्यांची तातडीने दुरुस्ती व पाण्याचा निचरा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
शहादा तालुक्यातील मंदाणे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्याचे राज्य उपाध्यक्ष मा. गणेश खर्डे यांनी केली आहे.
मंदाणे हे परिसरातील महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव असल्याने आसपासच्या अनेक गावांमधून नागरिक खरेदी-विक्री तसेच विविध कामांसाठी येथे येतात. मात्र गावातील खराब रस्ते आणि साचलेल्या पाण्यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मीताली शेट्टी, शहादा तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती शहादा यांना निवेदन देण्यात आले आहे.
संबंधित विभागाने मंदाणे गावातील सर्व रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे बुजविणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करणे तसेच आवश्यक ठिकाणी गटारी व कायमस्वरूपी रस्त्यांची कामे करावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि गावाच्या विकासाचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घ्यावी. अन्यथा प्रशासनाकडून दखल न घेतल्यास ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने पुढील भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही गणेश खर्डे यांनी दिला आहे.


0 Comments