Advertisement

९ वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनींनी बाळाला जन्म दिला; मुख्याध्यापक व अधिक्षिकाला निलंबित करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

९ महिने आश्रमशाळा प्रशासन काय करत होते? बिरसा फायटर्सचा सवाल

शहादा प्रतिनिधी - नाशिक जिल्ह्यातील कळवण येथील शासकीय आदिवासी निवासी शाळेतील एका अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन शाळा मुख्याध्यापक, अधिक्षक व संबंधित दोषींना तात्काळ सेवेतून निलंबित करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके व आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
                     निवेदनात म्हटले आहे की,नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे.येथील मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने  बाळाला जन्म दिल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अत्याचारामुळे ही विद्यार्थिनी गरोदर राहिली होती. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात  पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
              या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला कमालीची गुप्तता पाळली होती. दरम्यान, हा प्रकार आश्रमशाळेच्या आवारात घडलेला नाही, असा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थिनी जेव्हा सुट्ट्यांवर आपल्या गावी गेलेली होती, त्याच काळात हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आले आहे. मात्र, आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे. आश्रम शाळेत दैनदिन आरोग्य तपासणी करताना एवढी मोठी बाब लक्षात का आली नाही? ९ महिने गरोदर मुलगी राहिली तरी आश्रमशाळा प्रशासन काय करत होते? त्यांच्या हे लक्षात का आले नाही? असा सवाल बिरसा फायटर्स संघटनेने केला आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्याध्यापक ,अधिक्षक व संबंधित दोषींवर तात्काळ सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments