गुराडपाडा विकासापासून वंचित; मूलभूत सुविधांसाठी बिरसा फायटर्सची जोरदार मागणी
नंदुरबार प्रतिनिधी:-मलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गुराडपाडा येथील वीज, रस्ता, आरोग्य व शैक्षणिक समस्या तात्काळ सोडविण्याबाबत तसेच समस्या न सुटल्यास बिरसा फायटर्सच्या वतीने आंदोलन करण्याबाबत.अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, कार्यकारी अधिकारी अभियंता शहादा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग शहादा, यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा,व गुराडपाडा येथील नागरीक खजन तिरसे, विकास सुळे, यांच्या सह्या आहेत,
निवेदनात म्हटले आहे की शहादा तालुक्यातील मलगाव अंतर्गत येणाऱ्या गुराडपाडा येथील नागरिक अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावात वीज, रस्ता, आरोग्य सेवा व शिक्षणाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण झालेल्या असून यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अत्यंत कठीण झाले आहे.
गुराडपाडा येथील अनेक कुटुंबांना अद्याप नियमित वीजपुरवठा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना रात्री अंधारात राहावे लागत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तसेच शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होत आहे. वीज उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी विहिरी व पंपाद्वारे सिंचन करू शकत नाहीत. परिणामी शेती उत्पादन घटत असून अनेक नागरिकांना रोजगारासाठी इतर राज्यांत स्थलांतर करावे लागत आहे.
तसेच गावात ये-जा करण्यासाठी दर्जेदार रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नदी-नाल्यांना पूर आल्यावर विद्यार्थी व शिक्षकांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते. अनेक वेळा विद्यार्थी किंवा शिक्षक शाळेत पोहोचू शकत नाहीत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.
याशिवाय शाळेच्या इमारतीची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. गावात आरोग्य सुविधांचाही अभाव असून आजारी नागरिकांना उपचारासाठी दूरवर जावे लागते. यामुळे विशेषतः महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
सदर समस्यांबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी तसेच महावितरण कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
म्हणून आपणास विनंती करण्यात येते की, गुराडपाडा येथील पुढील समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात :
खालील प्रमाणे मागण्या
१. गावात नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा.
२. गुराडपाडा येथे सर्व ऋतूंमध्ये वाहतुकीस योग्य असा रस्ता निर्माण करावा.
३. शाळेची इमारत दुरुस्त करून आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
४. गावातील आरोग्य सेवा सक्षम करून नागरिकांना मूलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
५. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून समस्यांवर तातडीने कार्यवाही करावी.
अन्यथा, वरील मागण्यांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास बिरसा फायटर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने संबंधित कार्यालयांसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.


0 Comments