पाणी टपकणारी बसगाडी जाते खासदारच्या गावाला
नंदुरबार प्रतिनिधी:- धडगाव तालुक्यातील धडगाव ते असली जाणारी पाणी टपकणारी बसगाडी बघून "झुक झुक अगीनगाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी;पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया" ही इयत्ता पहिलीची कविता आठवते. टप टप टप बसगाडी, खासदारच्या गावाला जाऊया, अशी कविता आता म्हणायलाही हरकत नाही.कारण नंदुरबार लोकसभाचे खासदार गोवाल पाडवी यांच्या असली या गावात चक्क पाणी टपकणारी एस टी महामंडळाची बस गाडी जात असल्याचा एक विडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.या पाणी टपकणा-या गाडीमध्ये कंडक्टर पाण्यापासून टिकीट व पैशै वाचवून प्रवाशांची तिकिट जेमतेम काढत आहे,पाणी टपकणा-या सीटच्या बाजुला खिडकीजवळ एक प्रवासी बसून मस्त पळती झाडे पाहत आहे.टपकणा-या बसमध्ये काही प्रवाशी पाण्याने भिजलेले आहेत.काही उभेच प्रवास करत आहेत,कारण पावसाच्या टपकणा-या पाण्याने आधीच सीट आरक्षित करून ठेवल्या आहेत.खड्डेमय रस्त्यावर खुळ खुळ करीत व पाणी टपकवत खासदारच्या गावाला जाणा-या बसगाडीची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. एसटी महामंडळाच्या लाल बस मध्ये साधारणतः सामान्य व गरिब लोकच प्रवास करतात.पैशाने श्रीमंत लोक किंवा आमदार व खासदार एसटीबसने सहजा प्रवास करत नाहीत.त्यामुळे या पाणी टपकणा-या बसगाडीकडे खासदार व आमदार यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे निवडून आलेल्या नंदूरबारचे खासदार गोवाल पाडवी यांचे असली हे मूळ गाव आहे. खासदारचे वडील के सी पाडवी हे सुद्धा अक्कलकुवा- अक्राणी मतदारसंघाचे ३५ ते ४० वर्षे आमदार होते व आदिवासी विकास मंत्री सुद्धा होते. असली हे गाव रस्त्याच्या बाबतीत खूप नावाजलेले गाव आहे.४० वर्षं आमदार राहूनही स्वतःच्या असली- अस्तंभा या गावाकडे जाणारा रस्ता अद्याप के सी पाडवी यांनी बनवला नाही, म्हणून परिसरातील लोकांनी नाराजी व्यक्त केली होती.धडगाव ते असली रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, म्हणून बिरसा फायटर्स़ या सामाजिक संघटनेकडून याच रस्त्यावर घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.आमदार व खासदारच्या असली गावाकडे जाणा-या रस्त्याबाबत आदिवासी बांधव सातत्याने तक्रार करत होते,आता चक्क पाणी टपकणारी बसगाडी असली गावाला जाते, म्हणून तक्रार करु लागले आहेत.निदान खासदारच्या गावाला तरी एस टी महामंडळने चांगली बसगाडी सोडावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


0 Comments