हिना गावीत व विजयकुमार गावीत यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा ; बिरसा फायटर्स आक्रमक!
नंदुरबार प्रतिनिधी: आदिवासी समाजाच्या नंदुरबार जिल्हयातील माजी खासदार डॉ. हिना गावीत व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांना विजय चौधरी यांनी जातीवाचक व वाईट शिविगाळ करून अपमानित केल्याबद्दल अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अन्वये व भारतीय न्याय संहिता कायद्द्यांतर्गत गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलिस अधीक्षक नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले आहे.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नंदुरबार जिल्हयातील आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले माजी खासदार डॉ. हिना गावीत व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्याबाबत विजय चौधरी यांनी जातीवाचक, अपमानास्पद व आक्षेपार्ह भाषेचा वापर करून शिविगाळ केल्याचे निदर्शनास आले आहे. सदर प्रकारामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या असून, समाजामध्ये तीव्र संताप व असंतोष निर्माण झाला आहे.सदर कृत्य हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, यामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत लागू असलेल्या संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. कायद्यापुढे सर्व समान असून, कोणत्याही व्यक्तीने जातीवाचक अपमान, अवमानकारक वक्तव्ये किंवा समाजाच्या भावना दुखावणारे कृत्य केल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
त्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून, उपलब्ध पुरावे व कायदेशीर तरतुदीनुसार विजय चौधरी यांच्याविरूद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, ९९८९ तसेच भारतीय न्याय संहिता कायद्दद्यांतील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा व कायद्यानुसार तात्काळ अटक करण्यात यावी. अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.


0 Comments