विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची गणेश खर्डे यांची मागणी
बागलाण | प्रतिनिधी बागलाण तालुक्यातील सोमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी काही संशयास्पद वस्तू आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या प्रकाराची तातडीने चौकशी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष मा. गणेश खर्डे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील काही वर्गांमध्ये लिंबू-मिरची, टाचण्या तसेच रक्तासारखे दिसणारे संशयास्पद डाग अथवा पदार्थ आढळल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेल्या खेळाच्या मैदानातही काही संशयास्पद वस्तू आढळल्याची माहिती आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये चिंता निर्माण होण्याची शक्यता असून, सदर वस्तू शाळेच्या परिसरात कोणी व कोणत्या कारणासाठी आणल्या, याची वस्तुनिष्ठ चौकशी होणे आवश्यक असल्याचे गणेश खर्डे यांनी म्हटले आहे.
घटनेची प्रत्यक्ष पाहणी करून आढळलेल्या वस्तूंची आवश्यकता असल्यास वैज्ञानिक पद्धतीने तपासणी करावी, शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळेच्या परिसरात योग्य सुरक्षा व देखरेखीची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच चौकशीदरम्यान कोणत्याही व्यक्तीचा सहभाग किंवा कायद्याचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधितांवर लागू कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अफवा अथवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन न देता या घटनेमागील वस्तुस्थिती प्रशासनाने तपासावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी भूमिका गणेश खर्डे यांनी व्यक्त केली.
या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद नाशिक, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती बागलाण, संबंधित पोलीस निरीक्षक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.


0 Comments