जजपेक्षा पोलिसांना जास्त पावर असतो,तर जज कशासाठी:- सुशिलकुमार पावरा
सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणी गंभीर प्रश्न; नंदुरबार कोर्टात न्याय मिळेल का ?
नंदुरबार प्रतिनिधी: फौजदारी विविध अर्ज क्रमांक ४११/२०२५ मधील दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या न्यायालयीन कामकाजाबाबत, तक्रारदार व साक्षीदार उपस्थित असतानाही तक्रारदाराची गैरहजेरी नोंदविल्याच्या कथित प्रकाराची चौकशी करण्याबाबत, साक्षीदारांवरील दबावाच्या आरोपांची दखल घेण्याबाबत तसेच निष्पक्ष व पारदर्शक न्यायप्रक्रियेसाठी सदर प्रकरण अन्य सक्षम न्यायालयात वर्ग करण्याबाबतची तक्रार सुशिलकुमार जहांगीर पावरा यांनी मुख्य न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार यांच्या कडे दिनांक १२/१०/२०२६ रोजी केली आहे. तक्रारीत नमूद केले आहे की,मी, श्री. सुशिलकुमार जहांगीर पावरा, बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष असून, माझ्यावर पोलीस कोठडीत कथितरीत्या अमानुष मारहाण करण्यात आल्याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून संबंधित न्यायालयात तक्रार दाखल केलेली आहे. सदर प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीची निष्पक्ष सुनावणी व्हावी, साक्षीदारांना निर्भयपणे साक्ष देता यावी आणि न्यायालयीन प्रक्रियेची पारदर्शकता कायम राहावी, यासाठी मी हे निवेदन सादर करीत आहे.
सदर प्रकरणातील न्यायालयीन कामकाजाबाबत काही गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, त्यांची अधिकृत अभिलेखांच्या आधारे निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सदर प्रकरणाच्या सुनावणीसाठी मी स्वतः न्यायालयात उपस्थित होतो. माझ्यासोबत साक्षीदारही उपस्थित होते. असे असतानाही माझी गैरहजेरी नोंदविण्यात आल्याचे माझ्या निदर्शनास आले.तसेच, दुपारच्या सत्रात दुपारी ३ वाजल्यानंतर संबंधित न्यायाधीश मा. श्री. बी. बी. चव्हाण न्यायालयात उपलब्ध नसल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही.या संदर्भात माझ्या वकिलांनी उपस्थितीच्या नोंदीबाबत विचारणा केली असता संबंधित न्यायालयीन कर्मचाऱ्याकडून समाधानकारक माहिती मिळाली नाही.माझ्या म्हणण्यानुसार, दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या न्यायालयीन कामकाजादरम्यान साक्षीदारांनी सांगितलेली साक्ष योग्य प्रकारे नोंदविण्यात आली नाही. तसेच, साक्षीदारांना घाबरविण्यात आल्याची माझी तक्रार आहे.सदर प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकारी माझ्यावर आणि साक्षीदारांवर दबाव आणत असल्याची मला भीती आहे. रात्री-अपरात्री घरात येऊन माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचे तसेच साक्षीदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे मी तक्रारीत नमूद केले होते.या तक्रारीची अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. सदर प्रकरणात ४ कोर्ट बदलण्यात आले आहेत. हा प्रश्न फक्त माझ्या एका व्यक्तीचा नसून निष्पक्ष न्याय प्रक्रिया, साक्षीदारांची सुरक्षितता आणि सर्व सामान्य नागरिकांचा जनतेचा न्यायालयावर विश्वासाचा आहे.म्हणून माझी तक्रार माननीय मुख्य न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार यांनी गांभीर्याने घ्यावी व मला न्याय द्यावा,अशी प्रतिक्रिया तक्रारदार सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.


0 Comments