Advertisement

आडगाव ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराचाराविरोधात बिरसा फायटर्सचा उपोषणाचा इशारा; गटविकास अधिकारी शहादा यांना निवेदन


शहादा प्रतिनिधी: मौजे आडगाव, ता. शहादा, जि. नंदुरबार येथील ग्रामसभा नियमितपणे न घेणे, ग्रामसभेच्या ठरावाशिवाय निधी खर्च केल्याबाबतची तक्रार, 5% पेसा निधी व 15वा वित्त आयोग निधीच्या जमा-खर्चाची सखोल चौकशी, ग्रामपंचायत अभिलेखांची तपासणी, विकासकामांची प्रत्यक्ष तांत्रिक तपासणी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्या कडे देण्यात आले आहे.मौजे आडगाव येथील ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांच्या वतीने हा सविस्तर तक्रार अर्ज सादर करण्यात येत आहे.ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी शासनाकडून विविध योजनांतर्गत निधी उपलब्ध होत असतो. त्यामध्ये 5% पेसा निधी, 15वा वित्त आयोग निधी तसेच इतर शासकीय निधींचा समावेश आहे. सदर निधीचा वापर नियमानुसार, पारदर्शक पद्धतीने व ग्रामसभेच्या निर्णय प्रक्रियेनुसार होणे अपेक्षित आहे.मात्र आडगाव ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांकडून वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, ग्रामसभा, निधीचा खर्च, विकासकामे व ग्रामपंचायत अभिलेख याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
           आडगाव ग्रामपंचायतीच्या संबंधित कालावधीतील ग्रामसभांची संपूर्ण चौकशी करण्यात यावी.ग्रामसभा इतिवृत्त, उपस्थिती नोंद व ठरावांची पडताळणी करण्यात यावी.5% पेसा निधीची वर्षनिहाय A ते Z आर्थिक चौकशी करण्यात यावी.15वा वित्त आयोग निधीची वर्षनिहाय जमा-खर्च तपासणी करण्यात यावी. ग्रामपंचायतचे बँक स्टेटमेंट, रोकडवही, बिल-व्हाउचर व इतर आर्थिक अभिलेख तपासण्यात यावेत.ई-ग्रामस्वराजवरील नोंदी व प्रत्यक्ष ग्रामपंचायत अभिलेख यांची तुलना करण्यात यावी. सर्व विकासकामांची स्वतंत्र तांत्रिक पथकाकडून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी. कामे अपूर्ण अथवा निकृष्ट आढळल्यास नियमानुसार जबाबदारी निश्चित करून रक्कम वसूल करण्यात यावी.निधीचा वापर नियमबाह्य असल्याचे चौकशीत आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.ग्रामसभांचे आयोजन नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक निर्देश द्यावेत.ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या ग्रामस्थांना कोणताही दबाव किंवा अडथळा निर्माण होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी.संपूर्ण चौकशीचा लेखी अहवाल तक्रारदार/ग्रामस्थांना उपलब्ध करून द्यावा.चौकशी न झाल्यास पंचायत समिती शहादा समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बिरसा फायटर्सचे आडगाव प्रमुख योगेश रावताळे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments