शहादा प्रतिनिधी :- शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहातील ३० ते ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेल्या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करणे, कठोर कारवाई करणे तसेच किचन शेड पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे वस्तीगृहातच जेवण बनविण्याची व्यवस्था सुरू करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहात सुमारे ३० ते ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची अत्यंत गंभीर घटना दिनांक ११ जुलै २०२६ रोजी घडली असून त्यापैकी ४ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. शहादा येथील अन्न विषबाधा प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी.या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचारी, संबंधित कंत्राटदार व इतर दोषींना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.बाधित सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार व आवश्यक आर्थिक मदत देण्यात यावी.राज्यातील सर्व समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहांमध्ये अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता व सुरक्षिततेची नियमित तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी.किचन शेड पद्धत तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे वस्तीगृहातच जेवण बनविण्याची व्यवस्था सुरू करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना ताजे, स्वच्छ व पौष्टिक अन्न मिळेल.भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जबाबदारी निश्चित करून प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.


0 Comments