Advertisement

शहादा येथील समाज कल्याण वस्तीगृहातील अन्न विषबाधा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; दोषींना निलंबित करा – बिरसा फायटर्सची मागणी


३० ते ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; किचन शेड पद्धत बंद करण्याची बिरसा फायटर्सची मागणी

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा; शहादा अन्न विषबाधा प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

शहादा प्रतिनिधी:-नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहातील ३० ते ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेल्या गंभीर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना तात्काळ निलंबित करणे, कठोर कारवाई करणे तसेच किचन शेड पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे वस्तीगृहातच जेवण बनविण्याची व्यवस्था सुरू करण्याबाबत.
या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,समाज कल्याण मंत्री, आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी नंदुरबार, आदिवासी विकास मंत्री, सहायक आयुक्त समाजकल्याण नंदुरबार यांना देण्यात आले आहे, यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, नंदुरबार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा,आदि कार्यकर्ते उपस्थित होते,

     निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहात सुमारे ३० ते ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची अत्यंत गंभीर घटना घडली असून त्यापैकी ४ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. ही घटना शासनाच्या देखरेखीतील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षेबाबत गंभीर निष्काळजीपणा दर्शवणारी आहे. या प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.
सध्या सुरू असलेल्या किचन शेड पद्धतीमुळे अन्नाच्या गुणवत्तेबाबत व स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता ही पद्धत तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे वस्तीगृहातच ताजे, स्वच्छ व पौष्टिक जेवण तयार करण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात यावी.

आमच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :

१.)शहादा येथील अन्न विषबाधा प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी.

२.)या घटनेस जबाबदार असलेल्या अधिकारी, कर्मचारी, संबंधित कंत्राटदार व इतर दोषींना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

३.)बाधित सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार व आवश्यक आर्थिक मदत देण्यात यावी.

४.)राज्यातील सर्व समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहांमध्ये अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता व सुरक्षिततेची नियमित तपासणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी.

५.)किचन शेड पद्धत तात्काळ बंद करून पूर्वीप्रमाणे वस्तीगृहातच जेवण बनविण्याची व्यवस्था सुरू करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना ताजे, स्वच्छ व पौष्टिक अन्न मिळेल.
 
६.)भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जबाबदारी निश्चित करून प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारण्यात यावी.

विद्यार्थ्यांच्या जीविताशी व आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असून शासनाने याची तातडीने दखल घेऊन वरील मागण्यांवर त्वरित कार्यवाही करावी, ही नम्र विनंती.अन्याथा बिरसा फायटर्स सामाजिक संघटनांकडून आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा इशारा बिरसा फायटर्स सामाजिक संघटनांकडून देण्यात आला,

Post a Comment

0 Comments