Advertisement

मलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिपल्यापाडा–मलगाव रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा; अन्यथा तीव्र आंदोलन – बिरसा फायटर्स


शहादा प्रतिनिधी : शहादा तालुक्यातील मलगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिपल्यापाडा–मलगाव या मुख्य संपर्क रस्त्याचे तात्काळ खडीकरण, दर्जेदार डांबरीकरण तसेच आवश्यक ठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी नंदुरबार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, शहादा येथील कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे आणि योगेश देवरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, पिपल्यापाडा–मलगाव हा मुख्य संपर्क रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून संपूर्ण रस्ता उखडलेला आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात चिखल व पाणी साचते आणि पायी चालणेही कठीण होते.
या रस्त्याचा वापर परिसरातील नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, मजूर, रुग्ण तसेच आपत्कालीन सेवांसाठी दररोज केला जातो. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णवाहिका, शालेय वाहने व इतर वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे.
याशिवाय, या मार्गावरील नाल्यावर कायमस्वरूपी पूल नसल्याने पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढताच वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे गावाचा संपर्क तुटून विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात गंभीर अडचणी निर्माण होत आहेत.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, सदर रस्ता सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. मात्र आजपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत :
पिपल्यापाडा–मलगाव रस्त्याचे तातडीने सर्वेक्षण करून खडीकरण व दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे.
आवश्यक ठिकाणी कायमस्वरूपी पूल अथवा पुलियाचे तात्काळ बांधकाम करण्यात यावे.
पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीस योग्य होण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून कामास सुरुवात करावी.
रस्ता मंजूर असूनही काम का झाले नाही, याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Post a Comment

0 Comments