शहादा प्रतिनिधी:- टीईटी चा पेपर फोडणा- या आरोपींना फाशी द्या अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनिता पवार व शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २८ जून २०२६ रोजी टीईटी ( शिक्षक पात्रता परीक्षा) होणार होती.परंतू महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून रोजी राज्यभरात होणारी ही परीक्षा पेपरफुटीमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. नीट पेपर नंतर टीईटी चा पेपर फुटल्यामुळे परिक्षेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत. २७ जून रोजी पहाटे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात पोलिसांना काही प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन तपासले असता, त्यांच्याकडे सापडलेले प्रश्न आणि टीईटी परीक्षेचे मूळ प्रश्न तंतोतंत समान असल्याचे आढळून आले. या परीक्षेसाठी राज्यभरातून जवळपास २ लाख २६ हजार शिक्षक व उमेदवार बसणार होते. परीक्षा अचानक रद्द झाल्यामुळे लांबून आलेल्या उमेदवारांची मोठी गैरसोय झाली असून त्यांच्यामध्ये संताप आणि निराशा पसरली आहे.अनेक विद्यार्थी व शिक्षक या परिक्षेसाठी जीव लावून अभ्यास करीत होते, परंतु अचानक पणे परीक्षा रद्द झाल्याने त्यांच्यात संताप निर्माण झाला आहे .आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून नवीन तारीख जाहीर केली जाईल. असे परीक्षा परिषदने म्हटले आहे. देशातील सगळी यंत्रणा भ्रष्ट झाली आहे.देशात लबाड लोकांची संख्या वाढली असून भ्रष्टाचाराने हाहाकार माजवला आहे.यामुळे देशातील जनता त्रस्त आहे. वारंवार फुटणा-या पेपर मुळे जनतेचा संपूर्ण व्यवस्थेवरचा विश्वास नाहीसा झाला आहे.


0 Comments