नंदुरबार प्रतिनिधी:-नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराला 'जननायक टंट्या मामा भिल' नाव द्या, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व रेल्वे व्यवस्थापक नंदुरबार रेल्वे स्टेशन यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील इतिहास, संस्कृती आणि क्रांतिकारी वारसा अत्यंत समृद्ध आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या भागाने अनेक आदिवासी योद्धे आणि स्वातंत्र्यसैनिक घडविले आहेत. त्यामुळे अशा महान क्रांतिकारकांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. जननायक टंट्या मामा भिल हे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणारे थोर आदिवासी क्रांतिकारक होते. अन्याय,शोषण आणि अत्याचाराविरुद्ध त्यांनी संघर्ष करत गरीब व वंचितांसाठी आयुष्यभर लढा दिला. जल, जंगल, जमीन आणि आदिवासी स्वाभिमानासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी मानले जाते. गरीबांच्या मदतीसाठी ओळख निर्माण झाल्यामुळे त्यांना इंडियन रॉबिनहुड म्हणूनही संबोधले जाते. नंदुरबार रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक असून जिल्ह्याचे प्रमुख प्रवेशद्वार मानले जाते. दररोज हजारो प्रवासी येथे ये-जा करतात.तरी नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारास इंडियन रॉबिनहुड जननायक टंट्या मामा भिल प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.


0 Comments