शहादा प्रतिनिधी:- शहादा तालुक्यातील सुतगिरणी फाटा ते तिखोरा ३ किलोमीटरचा रस्ता ,१० फूट खड्डे पडलेला रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करून दुरूस्ती करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,आकाश तडवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील सुतगिरणी फाटा ते तिखोरा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला आहे. रस्त्यावर मोठ -मोठे खड्डे म्हणजेच १० फूट खोल खड्डे पडले आहेत.शहादा ते प्रकाशा या मुख्य मार्गावर डामरखेडा येथे पुलाचे काम सुरू असल्या कारणास्तव अनेक जड वाहने याच मार्गाने ये जा करतात, एस टी महामंडळाच्या सर्वच गाड्या याच मार्गाने ये जा करतात. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था होऊन खूप धूराळा उडतो.प्रवाशी वाहनधारक रूमाल बांधून प्रवास करतात.
एस टी व इतर जड वाहनांसाठी हा पर्यायी व जवळचा एकमेव मार्ग असल्याकारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते.ठेकेदार व बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे बारा वाजले आहेत.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.या रस्त्यावरून गरोदर महिला,वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून शहादा तालुक्यातील सुतगिरणी फाटा ते तिखोरा ३ किलोमीटरचा रस्ता नव्याने खडीकरण व डांबरीकरण करून दुरूस्त करण्यात यावा,अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.


0 Comments