Advertisement

दापोलीतील मंडळ अधिकाऱ्याचा अजब कारभार


गरिब निराधार महिलांची केली फसवणूक

दापोली: दापोली मधील निगडे गावातील श्रीम. रुक्मिणी बाबू रेवाळे या निराधार वयोवृद्ध महिलेला मंडळ अधिकारी श्री. सुधीर पारदुले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर जमीन हडप केल्याची फिर्याद रेवाळे यांनी केली आहे. तसेच श्रीम. शेवंती गणपत कानसे रहाणार शिर्दे, या वयोवृद्ध महिलेनेही माझी फसवणूक करून खोटे अंगठे उमटवून वळणे येथील श्री. रितेश मोहिते यांचेसह संगनमताने फसवणूक करून जमीन हडप केल्याचा आरोप मंडळ अधिकारी सुधीर पारदुले यांचेवर केला आहे.
     श्रीमती रुक्मिणी रेवाळे यांचे असे म्हणणे आहे की, मी विधवा असून मला कोणीही मुलबाळ नाही. माझा उदरनिर्वाह संजय गांधी निराधार योजनेवर चालतो. वयोमानामुळे तब्येत साथ देत नाही. कामधंदा होत नाही. त्यामुळेच माझ्या मालकीची मौजे निगडे येथील स.नं. ४/७ब क्षेत्र ०.६२.०० ही जमीन विकण्याचे ठरविले. २०२१ मध्ये माझे ओळखीचे काशिराम महादेव जोशी व रितेश बाळकृष्ण मोहिते रहाणार वळणे हे मंडळ अधिकारी श्री. सुधीर पारदुले यांना माझ्या घरी घेऊन आले. जमिनीच्या व्यवहाराबाबत चर्चा केली. चर्चेअंती २,४०,०००/- या किंमतीला सुधीर पारदुले जमीन घेण्यास तयार झाले. त्यानंतर रितेश मोहिते हे मला तहसिलदार कार्यालयात घेऊन गेले. त्याठिकाणी पार्सले यांची भेट घडवून आणली. त्यावेळी पारदुले मला म्हणाले की, तुम्ही जी जमीन देत आहेत ती तुकडा जमीन असल्याने खरेदी खत होणार नाही. त्यासाठी जागेची सरकारी मोजणी आवश्यक आहे. मध्ये वेळ खूप जाईल असे सांगून साठे खत करून घेतले. व मला मला ठरलेल्या व्यवहारापोटी ५०,०००/- रूपयांचा चेक दिला. तो चेक मी स्टेट बॅंक खात्यात जमा केला. त्यानंतर चार दिवसांनी खरेदी खतासाठी आणखीन कागदपत्र काढण्यासाठी पैसे लागतील असे सांगून रितेश मोहिते व काशीराम जोशी यांनी ते ५०,०००/- रू. माझ्याकडून परत घेऊन गेले. त्यानंतर ७ ते ८ महिने उलटले तरी खरेदी खत होत नाही म्हणून विचारणा केली असता माझी समजूत काढून व उरलेले पैसे देतो असे सांगून मला परत तहसिलदार कार्यालय येथे नेऊन माझ्याकडून सह्या करून घेतल्या. परंतु अद्याप मला पैसे दिलेले नाहीत. या माझ्या फसवणुकीला सर्वस्वी सुधीर पारदुले, रितेश मोहिते व काशीराम जोशी हे जबाबदार आहेत. त्यांनी संगनमताने माझे जागेचे बेकायदेशीर खरेदी खत करुन ७/१२ उताऱ्यावर आपले नाव लावून घेऊन सुधीर पारदूले यांनी पदाचा गैरवापर केला आहे. तरी सदरचे बेकायदेशीर खरेदी खत रद्द करून ही जमीन माझी मला परत मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
     तसेच शेवंती गणपत कानसे यांचीही अशाच प्रकारे फसवणूक करून शिर्दे येथील स.नं. १५/५ अ, २०अ/१३/२, ५/४५ ही जमीन कागदपत्रांवर खोटे अंगठे उमटवून फसवणूक केल्याचा आरोप शेवंती कानसे यांनी सुधीर पारदुले, रितेश मोहिते व काशीराम जोशी यांचेवर केला आहे.

Post a Comment

0 Comments