Advertisement

मृत ( मयत) व्यक्तीवर ४३ गुन्हे (FIR) दाखल ; नंदुरबार पोलिसांचा कारनामा; बिरसा फायटर्सचा गंभीर आरोप !

जय वळवी हत्याकांड विरोधातील मुक मोर्चाचा मुख्य आयोजक मृत व्यक्ती ?

नंदुरबार प्रतिनिधी:- भारतात मृत व्यक्तीवर गुन्हा (FIR) दाखल करता येत नाही आणि फौजदारी खटलाही चालवला जाऊ शकत नाही.असा कायदा असतांना नंदुरबार जिल्ह्यातील पोलिसांनी चक्क ८ महिन्यांपूर्वी मयत झालेल्या राजकुमार सोनवणे या व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.विशेषत म्हणजे या मृत व्यक्तीला मुक मोर्चाचा मुख्य आयोजक गृहित धरून नंदुरबार शहर पोलिस ठाणे व उपनगर पोलिस ठाणे नंदुरबार अशा दोन पोलिस ठाण्यात एकूण  ४३  पेक्षा अधिक कलमे  लावून आरोपी करण्यात आले आहे. नंदुरबार पोलिसांनी मृत व्यक्तीवर खोटा व बनावट गुन्हा दाखल केला.मात्र आजपर्यंत त्या आरोपीला ते अटक करू शकले नाहीत.कारण  गुन्हा दाखल करण्यापूर्वीच म्हणजे ८ महिने अगोदर सदर व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
                 जय वळवी या आदिवासी तरुणाचा सूर्यकांत सुधारक मराठे यांनी नंदुरबार शहरात एका पोलिसाच्या संगनमताने,पोलिसाच्या देखत चाकू मारून खून केला होता.या हत्याकांडाच्या निषेधार्थ दिनांक २४/०९/२०२५ रोजी आदिवासी समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर मूक मोर्चा काढण्यात आला होता.या मोर्चाला षडयंत्र पूर्वक दंगलीचे स्वरूप देऊन अनेक निरपराध आदिवासी तरूणांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून पोलिसांनी अटक केली होती.यात प्रामुख्याने आदिवासी संघटनांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना मोर्चाचे आयोजन म्हणून पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.मुक मोर्चा आयोजक आरोपींमध्ये आरोपी क्रमांक ४ वर राजकुमार सोनवणे यांच्या वर गुन्हा दाखल करून आरोपी बनवण्यात आले आहे. राजकुमार सोनवणे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष होते. ज्यांचा मूक मोर्चा होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. 
                 तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारकिर्दीत गुन्हा  दाखल करण्यात आला असून बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलिस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिविगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याप नंदुरबारचे तत्कालीन पोलिस अधीक्षक श्रवण दत्त ,अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार व पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील तत्कालीन पोलिस ठाणे नंदुरबार यांच्या वर केस नंबर ४११/२०२५ अन्वये जिल्हा व सत्र न्यायालय नंदुरबार येथे केस दाखल आहे.पोलिस अधिकारी हे आदिवासी लोकांवर अशा प्रकारे खोटे व बनावट गुन्हे दाखल करून टार्गेट करत आहेत, याबाबत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी न्यूज चॅनलसमोर काही पुरावे दाखवले आहेत.हे पुरावे  आपण न्यायालयातही सादर करणार आहोत, खोटे गुन्हे दाखल करणा-या पोलिसांवर कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहोत, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्स़चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments