आदिवासींनी स्वखर्चाने व मेहनतीने केली पाण्याची व्यवस्था, प्रशासनाचे दुर्लक्ष !
अक्कलकुवा प्रतिनिधी: जल जीवन मिशन ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याद्वारे प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. नंदुरबार जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'जिल्हा पाणी व स्वच्छता अभियान' (जिल्हा परिषद) अंतर्गत काम सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांसह प्रत्येक ग्रामीण घरोघरी नळाद्वारे पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी पोहोचवणे,हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. परंतु अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तोलवापाडा सारख्या दुर्गम भागात ही योजना नुसती नावापुरती व कागदोपत्रीच असून येथील आदिवासी बांधव आजही थेंब थेंब पाण्यासाठी रानोरानी भटकतात.शासनाकडे अनेकदा निवेदने देऊन व्यथा मांडूनही दुर्लक्ष होत असल्याने येथील आदिवासींनी स्वमेहनतीने डोंगरावरच एक हौद खोदला.त्या हौदातून नळीवाटे आपल्या पाड्यात २ किलोमीटर पर्यंत पाणी पोहचवण्यासाठी मोठी कसरत केली आहे.
पिंपळखुटा मोठा तोलवापाडा हा पाडा ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येतो.सातपुड्याच्या अति दुर्गम भागातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणा-या तोलवापाडा या पाड्यात एकूण ६६ कुटुंब राहत असून एकूण लोकसंख्या ४५५ इतकी आहे. पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा या गावाचे अंतर केवळ ४ किलोमीटर आहे.स्वातंत्र्याची ७९ वर्षे झाली तरी येथील आदिवासी रस्ता, पाणी, वीज , शाळा, अंगणवाडी , दवाखाना या प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. रस्ता नसल्याने डोंगरद-यातून व घाटातून पायीच पिंपळखुटा आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने गेल्या ५ वर्षांत गर्भवती महिलांसह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे. बिरसा फायटर्स या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात भेट देऊन तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. जल जीवन मिशन योजने अंतर्गत पिंपळखुटा मोठा तोलवापाडा येथे पाण्याची सोय करण्याची मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या कडे करण्यात आली आहे.


0 Comments