चोरी, लुटमार, हत्या करीत असल्याचे पोलिसांवर गंभीर आरोप
नंदुरबार प्रतिनीधी:- महाराष्ट्रातील पोलिस विना वर्दीत रात्री घरात घुसून चोरी, लुटमार,हत्या सारखे गंभीर गुन्हे करीत असल्याकारणास्तव पोलिसांना पोलिस वर्दी बंधनकारक करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस महासंचालक मुंबई, विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक, जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील काही पोलिस अधिकारी व पोलिस हे विना वर्दीत चोर ,डाकू, लुटेरा,हत्यारा, गुंडांची भुमिका बजावत आहेत.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वेरूळ येथील शिक्षक सुभाष बोरसे यांच्या हत्या प्रकरणात विना वर्दीत राहून पोलिसांनी शिक्षक सुभाष बोरसे यांना अमानुषपणे मारहाण करून हत्या केली. हत्येपूर्वी गाडीत विना वर्दीत बसलेल्या पोलिसांना शिक्षक सुभाष बोरसे यांनी तुम्ही पोलिस आहात,तर तुमची वर्दी कुठे आहे? असा प्रश्न विचारला. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिस ठाण्यातील प्रविण सोनवणे सहायक पोलिस निरीक्षक, युवराज पाटील, घनश्याम सूर्यवंशी, दिपक चौधरी सह विना वर्दीतील पोलिस यांनी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या राहत्या घरात दिनांक २५/०१/२०२६ रात्री अचानकपणे विना वर्दीत तोंडाला मास्क व रूमाल बांधून मोबाईल्स, मूळ कागदपत्रे, पैसे सह इतर वस्तू चोरल्याची शहादा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे.रात्री घरात विना वर्दीत मास्क रूमाल बांधून घुसणारे हे पोलिस होते की चोर? असा सवाल शहादा तालुक्यातील आदिवासी महिला व रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
पुणे शहरात एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) हुक्का पार्लर चालकाकडून दरमहा २० हजारांचा हप्ता घेतल्याची धक्कादायक लाचखोरीची घटना समोर आली आहे.जळगाव जामोद येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिला पोलीस उपअधीक्षकाने (DSP) आपल्याच जिवलग मैत्रिणीच्या घरातून २ लाख रुपये आणि मोबाईलची चोरी केल्याची घटना घडली, जी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील वाहतूक पोलिसांनी धडगाव येथील आदिवासी प्रवाशांकडून ९७ हजार रुपये लुटमार केल्याची घटना डोळ्यासमोर येते. खरे पोलिस कसे ओळखायचे? खाकी वर्दीतले की विना वर्दीत मास्क व रूमाल तोंडाला बांधून चोरी व हत्या करणारे? असा प्रश्न जनतेला निर्माण झालेला आहे.


0 Comments