बिरसा फायटर्स संघटनेने केला घटनेचा निषेध
नंदुरबार प्रतिनिधी- 'कॉकरोच जनता पार्टी' चे संस्थापक अभिजीत दिपके यांना १५ जून २०२६ रोजी जयपूर येथील आंदोलनादरम्यान मारहाण करीत भ्याड हल्ला करणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या भ्याड हल्ल्याचा बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की,कॉकरोच जनता पार्टी' चे संस्थापक अभिजीत दिपके यांना १५ जून २०२६ रोजी जयपूर येथील शहीद स्मारक येथे एका विद्यार्थी आंदोलनादरम्यान गुंड लोकांकडून मारहाण करण्यात आली. नीट (NEET) पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या विरोधात आयोजित सभेला संबोधित करण्यासाठी ते मंचावर जात असताना, गर्दीतील काही अज्ञात समाजकंटकांनी त्यांना धक्काबुक्की करत थप्पड लगावल्या. सीजेपी च्या वतीने नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. अभिजीत दिपक समर्थकांच्या खांद्यावरबसून सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना, गर्दीतून आलेल्या काही लोकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. तरूणांना घाबरवण्याचा आणि मुख्य मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे . अभिजीत दिपके यांच्या वरचा हा हल्ला भारत देशातील संपूर्ण तरूणांवर आहे.ही लढाई विचारांची आहे, हक्क अधिकाराची व सत्याची आहे.परंतू या लोकशाही मार्गाने चाललेल्या लढ्याला काही समाजकंटक मारहाण व हल्ला करून गालबोट लावत आहेत.अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्स़चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.


0 Comments