Advertisement

चांदसैली घाटावरील रस्त्यासाठी बिरसा फायटर्सने छेडले घंटानाद आंदोलन

धडगांव प्रतिनिधी: धडगांव ते तळोदा मार्गावरील चांदसैली घाटावरील खड्डेमय व धोकादायक रस्त्याच्या दुरूस्तीसाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून दिनांक ११ जून २०२४ रोजी दुपारी १२ वाजता चांदसैली घाटावर घंटानाद आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनात बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव बारक्या पावरा,जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा ,विजय खर्डे,हारसिंग पावरा,रवींद्र पावरा,देवलसिंग पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.रस्त्यावरील खड्डे बुजवा,नाहीतर खुर्च्या खाली करा,बिरसा फायटर्स जिंदाबाद,अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनस्थळी इंजिनिअर एन टी वसावे,उपविभागीय अधिकारी,सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ तळोदा व पोलीस निरीक्षक धडगांव, पोलीस निरीक्षक तळोदा व संबंधित ठेकेदार यांनी लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.या रस्त्याचे विहीत मुदतीत काम पूर्ण करावे , रस्त्यावर होणा-या जीवीतहानीस सर्वस्वी जबाबदार संबंधित ठेकेदार राहतील, असा आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिला आहे.
                   नंदूरबार जिल्ह्य़ातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे.अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो.जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत. धडगांव तालुक्यातील रस्ते हे खड्डेमय असून लाजिरवाणे आहेत. धडगांव ते तळोदा मार्गावरील चांदसैली घाटावरील रस्ता हा अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे.हा रस्ता पूर्ण पणे उखडला आहे.रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे झाले आहेत.रस्त्यावर मोठमोठे दगड गोटे पडलेले दिसतात. रस्त्याच्या आजूबाजूलाच ब-याच ठिकाणी आळोशाला भिंत नाही. रस्ता अत्यंत धोकादायक आहे.या रस्त्यावरून अनेक वाहनांचे अपघात होऊन प्रवाशांना दुखापत होत आहे.प्रवाशी मुठीत जीव घेऊन प्रवास करतात. या रस्त्यावर पूर्वी सुद्धा अनेक भयंकर अपघात झाले आहेत. त्यात अनेक निरपराध जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.आता सुद्धा या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे.तरी लोकप्रतिनिधी व अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून बिरसा फायटर्स संघटनेकडून हे आंदोलन छेडण्यात आले.

Post a Comment

0 Comments