Advertisement

दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा संपन्न

दापोली : दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयाच्या आय. क्यू.एस. सी. तर्फे नवीन शैक्षणिक धोरण 2020 या विषयावरची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
 सदर कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी विभागाच्या बहिशाल अभ्यासक्रमांचे प्रमुख प्रा. मंदार भानुशे आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबईचे प्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते.
प्रा. भानुशे यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण पद्धतीचा आकृतीबंध या विषयावर बोलताना नवीन धोरणानुसार शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित असेल त्यामुळे शिक्षकांनाही अनेक कौशल्ये आत्मसात करावी लागतील किंवा असलेली कौशल्ये आणखी विस्तारित करावी लागतील असे प्रतिपादन केले.
डॉ. शिंदे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे क्रेडिट फ्रेमवर्क या विषयावर विवेचन केले. या धोरणातील अनेक क्लिष्ट संकल्पना त्यांनी साध्या आणि सोप्या शब्दात सांगताना त्यांनी त्यांच्या महाविद्यालयाची उदाहरणे दिली. त्यांच्या महाविद्यालयात येत्या जून पासून हे नवीन धोरण राबवण्यासाठी कशी आणि काय तयारी त्यांच्या महाविद्यालयाने केली आहे हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून उपस्थितांसमोर मांडले. यावेळी दोन्हीही मार्गदर्शकांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांना विस्तृत उत्तरे दिली.
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील 80 पेक्षा जास्त शिक्षक उपस्थित होते. या मध्ये हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज आणि सिनियर कॉलेज चे शिक्षक, प्राचार्य आणि आय. क्यू. एस. सी. समन्वयक यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला दापोली शिक्षण संस्थेचे संचालक श्री. दिनेश नायक हे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांच्यासह संचालक श्री मिहिर महाजन, सौ. आर्या भागवत यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची संकल्पना आणि गरज महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे यांनी मांडली तर प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी प्रास्ताविकातून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस मेहता यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष मराठे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आय. क्यू. एस. सी. समन्वयक डॉ. आर. एल. घालमे, सहसमन्वयक प्रा. कैलास गांधी यांसह सर्व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments