सरपंचांच्या दुर्लक्षामुळे मंदाणेकर त्रस्त? खराब रस्त्यांवरून प्रशासनाकडे धाव!
शहादा : शहादा तालुक्यातील मंदाणे ग्रामपंचायत हद्दीतील बस स्टॉप ते भवानी माता मंदिरपर्यंतच्या भोंगरा रस्त्यासह गावातील इतर खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, या मागणीसाठी बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्याचे राज्य उपाध्यक्ष मा. गणेश खर्डे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
मंदाणे हे परिसरातील महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव असून विविध गावांमधून नागरिक खरेदी-विक्री तसेच शासकीय व दैनंदिन कामांसाठी येथे येत असतात. मात्र ग्रामपंचायत हद्दीतील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
विशेषतः मंदाणे बस स्टॉप ते भवानी माता मंदिरपर्यंतचा भोंगरा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अत्यंत खराब झाला आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल व दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार तसेच वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
यापूर्वीही या रस्त्यांच्या समस्येबाबत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर काही ठिकाणी ग्रामपंचायतीकडून मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली; मात्र रस्त्यांची समस्या अद्याप पूर्णपणे सुटलेली नाही, असा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
त्यामुळे प्रशासनाने मंदाणे ग्रामपंचायत हद्दीतील सर्व खराब रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे बुजविणे, आवश्यक ठिकाणी डांबरीकरण/काँक्रिटीकरण करणे तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी व जलनिस्सारणाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास आंदोलन
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने केवळ तात्पुरती डागडुजी न करता दर्जेदार व कायमस्वरूपी रस्ते दुरुस्ती करावी. प्रशासनाने मागणीची तातडीने दखल घेऊन नागरिकांना दिलासा न दिल्यास बिरसा फायटर्स व संबंधित सामाजिक संघटनांच्या माध्यमातून लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन देणारे :
मा. गणेश खर्डे
राज्य उपाध्यक्ष, बिरसा फायटर्स महाराष्ट्र राज्य


0 Comments