शहादा प्रतिनिधी :- नंदुरबार येथील एमकेडी नर्सिंग कॉलेजमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करून गैरव्यवहार प्रकरणी कालेजची मान्यता रद्द करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा मार्फत पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार येथील एसएमकेडी नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांकडून अवाजवी शुल्क वसूल करणे, भारत सरकारची शिष्यवृत्ती महाविद्यालयाच्या खात्यात वळवून घेणे, विविध कारणांसाठी बेकायदेशीर पैशांची मागणी करणे, नापास करण्याची धमकी देत मानसिक छळ करणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे उल्लंघन याविरोधात विद्यार्थ्यांचे कालेज प्रशासन विरोधात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.महाविद्यालय प्रशासन शासनाने मंजूर केलेल्या शुल्काव्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रक्कम वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज विद्यार्थ्यांकडून आयडी, पासवर्ड व ओटीपी घेऊन महाविद्यालय प्रशासन स्वतः भरुन घेत आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयाच्या खात्यात वळवली जाते आणि विद्यार्थ्यांच्या खात्यात केवळ २ ते ३ हजार रुपयांचा निर्वाह भत्ता जमा केला जात आहे. याशिवाय विद्यार्थ्यांकडून डोनेशनच्या नावाखाली बेकायदेशीर रक्कम उकळली जात आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली रक्कम परत मिळवून द्यावी आणि तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सूडबुद्धीने कोणतीही कारवाई होणार नाही, यासाठी प्रशासनाने संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांची स्वतंत्र चौकशी करून संबंधितांवर प्रतिबंधात्मक व फौजदारी कारवाई करावी. आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांची इतर महाविद्यालयात व्यवस्था करून एमकेडी नर्सिंग कॉलेजची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.


0 Comments