पोलीस अधीक्षक श्रवण दत्त विरोधात मोर्चा काढणार;आदिवासी संघटना आक्रमक!
नंदूरबार प्रतिनिधी:- नंदुरबार येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी जय वळवी या आदिवासी युवकावर पोलिसादेखत चाकूने प्राणघातक हल्ला करून खून करणा-या संशयीत आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे सह आरोपीविरुद्ध व पोलिस कर्मचारी चेतन चौधरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा,फाशी द्या व घटनेची एस आय टी चौकशी करून खुनाचा कटकारस्थान करणा-या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व पोलीस अधीक्षक नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश सचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,सुधीर वळवी,बिरसा फायटर्सचे वनकर पावरा, दादला पावरा,सुकलाल पावरा,सेल्या पावरा,कुसाल पावरा, खुलसिंग पावरा,सुरतान पावरा,जालमसिंग पावरा आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदुरबार येथे दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सूर्यकांत सुधाकर मराठे सह आरोपींनी तसेच पोलिस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या देखत संगनमताने जय वळवी नावाच्या आदिवासी युवकावर चाकूने वार करून त्याचा भररस्त्यात हत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या परिणामाने दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जय वळवी चा मृत्यू झाला.ही घटना नंदुरबार येथील सिंधी काॅलनीत घडली आहे. या प्राणघातक हल्ल्याचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ हा सीसी टिव्ही कॅमेरात रेकॉर्ड झाला असून तो सर्वत्र वायरल होतं आहे. वायरल व्हिडिओ मध्ये दावा करण्यात येत आहे की ज्या व्यक्तीने हत्या करण्याचा प्रयत्न केला तो एक पोलिससोबत आलेला. पोलीस कर्मचारी चाकू हल्ल्याची बघ्याची भूमिका बजावत आहे.यावरून पोलीस प्रशासनावर संशय निर्माण होत आहे.नंदुरबार पोलिसांनी या संपूर्ण घटनेची स्वतंत्र एस आय टी ने चौकशी करावी. दोषीसह जो पोलिस अधिकारी सोबत आहे त्याला निलंबित करून त्याच्यावर हत्येचा खटला चालवावा. अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.पोलिसांना आरोपी सापडत नाहीत, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या कारभारावर लोकांचा आक्षेप आहे,अशी प्रतिक्रिया भारतीय स्वाभीमान संघाचे प्रदेश सचिव रोहीदास वळवी यांनी दिली. पोलीस अधीक्षक श्रवण दत्त विरोधात आम्ही आदिवासी संघटना पुढील मोर्चा काढणार आहोत, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
0 Comments