बनावट दिव्यांग प्रमाणपत्रधारक शिक्षकांची जे.जे. रुग्णालयात पुनर्तपासणी – सीईओ नयन गोयल यांचा निर्णय
नंदुरबार प्रतिनिधी :जिल्हा परिषद शिक्षण विभागातील काही शिक्षकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी व बदलीमध्ये प्राधान्य मिळविल्याच्या तक्रारींवर कारवाईची गाडी पुढे सरकली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल यांनी संबंधितांची वैद्यकीय पुनर्तपासणी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला आहे.बिरसा फायटर्स संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे सीईओ यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये काही शिक्षकांनी एक लाख रूपयांत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र विकत घेऊन बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे सेवेत लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, राज्यभरात अशा प्रमाणपत्रांचा मोठा रॅकेट कार्यरत असून नंदुरबार जिल्ह्यात दोन कर्मचारी अशा प्रकारे आढळून आले आहेत.संघटनेने स्पष्ट मागणी केली आहे की, संबंधितांची सत्यता जे.जे. रुग्णालयात पुनर्तपासणी करून पडताळली जावी. दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंदवून सेवेतून तात्काळ बडतर्फीची कारवाई करण्यात यावी. शासनाने बदल्या ऑनलाईन करून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला असला, तरी काही शिक्षकांनी दिव्यांगतेचे खोटे भासवून बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे अन्याय्य लाभ घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकाराला प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचीही मूकसंमती असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. कोट्यवधी रुपयांची गुरुदक्षिणा देऊन या प्रमाणपत्रांचा वापर झाल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारी असूनही शिक्षणाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.सीईओ नयन गोयल यांनी दोषींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच पुढे असे प्रकार टाळण्यासाठी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेत पारदर्शकता व काटेकोर नियम लागू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अन्यथा संघटनेमार्फत तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.हे निवेदन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष जलिंदर पावरा व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख करण सुळे यांच्या स्वाक्षरीसह सादर करण्यात आले.
0 Comments