पिंपर्डे येथील घटनेबद्दल पोलिसांची भूमिका संशयास्पद; आरोपींची जामीनसाठी कोर्टात धावपळ!
शहादा प्रतिनिधी: शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील कृष्णा वाघ या आदिवासी व्यक्तीस जातीवाचक अश्लील शिवीगाळ करून जबर मारहाण करणा-या ६ आरोपींना तात्काळ अटक करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार व भारत आदिवासी संविधान सेना संघटनेकडून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,सुनिल पवार,दिलीप मुसळदे,सुरेश पवार, गोपिका वाघ,दिनेश वाघ, विमलबाई वाघ,कस्तूरीब़ाई चौधरी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील पिंपर्डे येथील कृष्णा भगवान वाघ या आदिवासी व्यक्तीस २८ मार्च २०२५ रोजी त्याच गांवातील अमोल हिरालाल कात्रे,जितेंद्र भबुतराव कात्रे,जयू जितेंद्र कात्रे,उज्वलाबाई हिरालाल कात्रे, मनिषा जितेंद्र कात्रे,अन्नपूर्णाबाई भबूतराव कात्रे या मराठा समाजाच्या ६ लोकांनी जातीवाचक अश्लील शिवीगाळ करीत पाईपने जबर मारहाण केली होती.त्यानंतर निलेश देसले पोलीस निरीक्षक यांनी फिर्यादीलाच पोलीस ठाण्यात डांबून ठेवले होते.आदिवासी फिर्यादी कृष्णा वाघची तक्रार घेणार नाही,आदिवासी महिलांची तक्रार घेत नाही,तुम्हाला काय करायचे ते करून घ्या,बाईला बोलवून तुमच्यावरच ३५४ चा गुन्हा दाखल करतो अशी धमकी सामाजिक कार्यकर्ते तथा बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी दिली होती. म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा येथे २९ मार्च २०२५ रोजी व पोलीस अधीक्षक नंदूरबार यांचेकडे १ एप्रिल २०२५ रोजी आदिवासी संघटनांमार्फत पोलीस निरीक्षक निलेश देसलेंविरूद्ध तक्रारी निवेदन देण्यात आले.अखेर पोलीस अधीक्षक नंदूरबार यांच्या भेटीनंतर पिंपर्डे येथील प्रकरणात ८ दिवसानंतर ४ एप्रिल २०२५ रोजी ॲस्ट्रासिटीचा व अन्य गुन्हे नोंद करण्यात आले.यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ११८(१),१२५ अ,२९६,१८९(२),१९० व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये कलम ३(१) आर,३(१) एस,३(२) वी ए अनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित ६ आरोपी पोलीस अटक करतील या भीतीने गांव सोडून फरार झाले.शहादा न्यायालयात आरोपींनी जामीनसाठी अर्ज केल्याचा समजते.गुन्हा दाखल होऊन ६ दिवस झाले तरी पोलीस आरोपींना अटक करत नाहीत, म्हणून पोलिसांच्या भूमिकेवरच आदिवासी संघटना कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला आहे.घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार हे करत आहेत. या प्रकरणासंबंधित सर्व ६ आरोपींना अटक करण्यात यावी.अन्यथा बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेना या आदिवासी संघटनांकडून पोलीस प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
0 Comments