Advertisement

HSRP नंबरप्लेट बदलण्याची सक्ती सरकारने करू नये- बिरसा फायटर्सची मागणी



५ वर्षांत किती गाड्या चोरील्या गेल्या? सरकारने माहिती जाहीर करावी- सुशिलकुमार पावरा

नंदूरबार प्रतिनिधी: HSRP नंबर प्लेट बदलण्याच्या सक्तीविरुद्ध व गाड्यांच्या सुरक्षिततेबाबत पारदर्शक माहिती द्यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
                     सध्या महाराष्ट्र राज्यात वाहनांसाठी High-Security Registration Plate (HSRP) सक्तीने लागू केली जात आहे. हे क्रमांकपट्ट्या बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असून, हे कंत्राट गुजरातमधील फक्त तीन कंपन्यांना दिले गेले आहे. यामध्ये सरकारचा हेतू जनतेच्या हिताचा आहे की निवडक कंपन्यांना फायदा पोहोचवण्याचा, याबद्दल संशय निर्माण होत आहे.सरकारने या नंबर प्लेट्स सक्तीने लावण्याचा निर्णय घेतला असून, त्यामागे चोरीस गेलेल्या गाड्या लवकर शोधता येतील, असे कारण दिले जात आहे. मात्र, २०१९ नंतर विक्री झालेल्या वाहनांपैकी चोरीस गेलेल्या गाड्यांपैकी सरकारने किती गाड्या परत शोधून दिल्या आहेत, याचा अधिकृत अहवाल आणि आकडेवारी तात्काळ प्रसिद्ध करावी.याशिवाय, HSRP प्लेट लावण्यासाठी आकारले जाणारे शुल्क अवाजवी आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार येत आहे. जर सरकारने हे क्रमांकपट्टे सक्तीने लावण्याचा निर्णय घेतला असेल, तर ते मोफत किंवा अत्यल्प दरात उपलब्ध करून द्यावेत.
                        महाराष्ट्रातील जनतेला सुरक्षित जीवन मिळावे, त्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात. परंतु, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न बाजूला ठेवून केवळ वाहनांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या नावाखाली सामान्य नागरिकांवर आर्थिक ओझे लादणे अन्यायकारक आहे.त्या अनुषंगाने, बिरसा फायटर्स आपल्या माध्यमातून खालील मागण्या करते:HSRP नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय ऐच्छिक करावा, सक्ती करू नये. या नंबर प्लेट्ससाठी आकारण्यात येणारे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे असावे.२०१९ नंतर चोरीस गेलेल्या गाड्यांबाबत सापडलेल्या वाहनांची अधिकृत आकडेवारी प्रसिद्ध करावी.या निर्णयामागे पारदर्शकतेचा अभाव दिसत असल्याने सरकारने संपूर्ण प्रक्रिया जनतेसमोर स्पष्ट करावी.जर वरील मागण्यांवर गांभीर्याने विचार केला गेला नाही, तर बिरसा फायटर्सच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यास बाध्य होईल.आपल्या त्वरित आणि सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments