बोर्ड लोकसभेत की विधानसभेत गेला?कोणत्या पुढा-याने नेला?ग्रामस्थांचा सवाल
नंदूरबार प्रतिनिधी: सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा अंतर्गत कालापाणी ते हेंगलापाणी ५ किलोमीटर रस्त्याचे कामाच्या भूमीपूजन दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी माजी अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे माजी आमदार तथा आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्या हस्ते नंदूरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी व गांवक-यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात करण्यात आले.या बोर्डवर कामाचे ठेकेदार शितल बिल्डींग मटेरियल ॲन्ड कन्स्ट्रक्शन धडगांव असेही नमूद करण्यात आले होते.कामाचे उद्घाटन होऊन १ वर्षाहून अधिक कालावधी झाला तरी रस्त्याचे व पुलाचे काम होत नाही.म्हणून बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांना ३ फेब्रुवारी २०२५ रोजी निवेदन दिले होते.त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंताने केलापाणी येथे जाऊन पाहणी केले असता बोर्ड लावून उद्घाटन केलेला सदर रस्ता मंजूर नसल्याचे सांगितले.हे ऐकून गावक-यांना धक्काच बसला.त्यानंतर बिरसा फायटर्स संघटनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
रस्ता नसल्याने १० दिवसापूर्वी केलापाणी येथील नवजात अर्भकाचा बाम्बूच्या झोळीतून दवाखान्यात नेतांना दुर्दैवी मृत्यू झाला.रस्ता नसल्यामुळे केलापाणी येथील नागरिकांना गाढवावरून माल वाहतूक करावी लागते.गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी व रूग्णांना बाम्बुलन्स च्या झोळीतून तब्बल १५ किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात न्यावे लागते.रस्ता मंजूर नसतांना आमदार व खासदार यांनी बोर्ड लावून उद्घाटन करून निवडणूक कालावधीत गांवक-यांना मूर्ख बनवल्याचे लक्षात आले. त्यानंतर आता चक्क बोर्डही गायब झाले आहे. आमदार व खासदाराने उद्घाटन केलेले रस्त्याचे बोर्ड लोकसभेत गेला की विधानसभेत गेली की पुढा-याने नेला? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.आमच्या रस्त्याचा बोर्ड शोधून द्या,रस्ता बनवून द्या,अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
0 Comments