योजनेमुळे ठेकेदारांचे पोट भरते; विद्यार्थांचे नाही- सुशिलकुमार पावरा
नंदूरबार प्रतिनिधी: आदिवासी विकास विभाग अंतर्गत सुरू असलेली अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना बंद करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके,आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग नंदूरबार यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, बिलीचापडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले ,गिरीजाबाई पटले,आट्या तडवी,उग्रावण्या पाडवी,राल्या वळवी,कालूसिंग वळवी,हाना पटलेवसंत भील,किसन रहासे,बाठ्या वळवी, जि-या डमलखे, मोत्या पाडवी,गोमा वसावे,जेल्या पटले,सिंगा वळवी,दिवाल्या वळवी,बाज्या भील, जयसिंग वसावे, रावल्या वळवी,ओल्या वळवी,बाज्या वसावे आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणा-या शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील मुलांना स्वच्छ व पौष्टिक जेवण मिळावे म्हणून सन २०१५ साली अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेचा ठेका टाटा ट्रस्ट व अक्षयपात्रात फाऊंडेशन बंगलोर सारख्या खाजगी स्वयंसेवी संस्थांना देण्यात आला आहे.शहादा तालुक्यातील चिरखान, चांदसैली अशा आश्रमशाळेत भेट दिली असता संघटनेस असे निदर्शनास आले की,हे जेवण अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे दिले जाते.जेवणात किडे पडलेले आढळले.जेवणाला चव नाही.जेवण ताजे, गरम व पोष्टीक नाही.अशा प्रकारचे जेवण नंदूरबार जिल्ह्य़ातील आश्रमशाळेतील विद्यार्थांना नंदूरबार येथे रात्री मोठ्या मशीन मध्ये बनवलेले सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा वेळी जेवण पुरवले जाते,खायला दिले जाते.त्यामुळे विद्यार्थी जेवण पोटभर खात नाहीत. जेवण फेकून देतात व ते फेकलेले जेवण प्राणीसुद्धा खात नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
या योजनेंतर्गत आश्रमशाळेतील विद्यार्थांना निष्कृष्ट जेवण देऊन ठेकेदार आमच्या विद्यार्थांच्या जीवाशी व आरोग्याशी खेळ खेळत आहेत. हे जेवण जेवल्यानंतर अनेक ठिकाणी विद्यार्थांच्या आरोग्यसंबंधीत समस्या निर्माण होत आहेत. काही ठिकाणी जेवणातून विद्यार्थांना विषबाधा होत आहे.विद्यार्थी आजारी पडत आहेत.विद्यार्थी व पालकांच्या याबाबत अनेक तक्रारी आहेत. या योजनेंतर्गत पुरवले जाणारे जेवण विद्यार्थांच्या आरोग्यास हानीकारक आहे. या योजनेमुळे विद्यार्थांचे नुकसानच नुकसान आहे व ठेकेदाराच फायदा आहे.पूर्वी आश्रमशाळेच्या ठिकाणीच स्वयंपाकी व कामाठी यांच्या माध्यमातून बनवलेले गरम व पौष्टिक जेवण दिले जात होते. त्याच पद्धतीने आश्रमशाळेत विद्यार्थांना ताजे,गरम व पोष्टीक जेवण देण्यात यावे.विद्यार्थांच्या आरोग्यास धोकादायक असणारी अन्नपूर्णा सेंट्रल किचन योजना तात्काळ बंद करण्यात यावी.अन्यथा विद्यार्थी व पालकांसोबत बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.
0 Comments