प्रकल्प अधिकारी नंदूरबार यांना निवेदन
नंदूरबार प्रतिनिधी: शासकीय आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृहातील प्रवेश क्षमता ही ५०० वरून १००० वाढवा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फाइटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,दिपक तडवी,पप्पू अवाया आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदूरबार अंतर्गत शहादा येथे शासकीय आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृहात सुरू आहेत. या वस्तीगृहात विद्यार्थी प्रवेश क्षमता ५०० इतकी आहे. नंदूरबार जिल्ह्य़ातील अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी शिक्षणासाठी शहादा येथे येत असतात. वस्तीगृहातील क्षमतेनुसार काहींना प्रवेश मिळतो.काही गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश मिळत नसल्याने नाईलाजास्तव बाहेर खोली करून राहावे लागते व आपले शिक्षण जेमतेम पूर्ण करावे लागते.काही विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती ही हलाखीची असल्याकारणाने त्यांना बाहेर खोली करून राहणे व इतर खर्च परवडत नाही.म्हणून पुढील शिक्षण घेत नाहीत. परिणामी शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणून शासकीय आदिवासी वस्तीगृहातील मुला मुलींची प्रवेश क्षमता १००० इतकी वाढवावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून आदिवासी विकास विभागाकडे करण्यात आली आहे.
0 Comments