दोन पदांवर काम करणा-यांचे धाबे दणाणले;चौकशी सुरू
नंदूरबार प्रतिनिधी : ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच,सदस्य पोलीस पाटील हे शिक्षकाची, आरोग्यसेवकाची नोकरी करीत आहेत, एकच व्यक्ती दोन्ही पदांवर काम करून दोन्ही पदांचे मानधन घेऊन शासनाची दिशाभूल करून फसवणूक करीत आहेत, अशांवर कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे दिनांक २ डिसेंबर २०२४ व दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजीच्या निवेदनाद्वारे करण्यात आली होती.त्या निवेदनाची दखल घेऊन वंदना वळवी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदूरबार यांनी जिल्ह्य़ातील सर्व गटविकास अधिकारी यांना चौकशी करून दिनांक १९ डिसेंबर २०२४ पर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दोन पदांवर काम करणा-या सरपंच, उपसरपंच, सदस्य व पोलीस पाटील यांचे धाबे दणाणले आहेत.
ग्रामपंचायतीचा कारभार चालविण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे सरपंच, उपसरपंच व सदस्यांची निवड होत असते. सरपंच हा गावाचा मुख्य पंच म्हणून ग्रामपंचायतचे काम पाहत असतो.सरपंचाला दरमहा ८ हजार रूपये मानधन व उपसरपंचाला ३ हजार मानधन देण्यात येते.पोलीस पाटीलला १५००० रूपये पगार दिला जातो.तरी काही गावांतील सरपंच , उपसरपंच,पोलीस पाटील पदावर असणारे व्यक्ती हे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत शिक्षक व आरोग्यसेवक म्हणून १०००० ते १२००० रूपये मानधन तत्वावर काम करीत आहेत.
एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या पदांवर काम करून दोन पदांचे पगार घेत आहेत, अशे व्यक्ती हे शासनाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक करीत आहेत मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना ही बेरोजगार सुशिक्षित तरुणांसाठी योजना आहे.परंतू गरजू व बेरोजगार उमेदवारांना डावलून सरपंच व उपसरपंच,पोलीस पाटील पदांवर असणा-या उमेदवारांस वशिल्याने व गोलमाल करून शिक्षक व आरोग्यसेवक म्हणून आदेश देण्यात आले आहेत. हे गरजू व बेरोजगार उमेदवारांवर अन्याय कारक बाब आहे .म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच ,पोलीस पाटील पदांवर असूनही शिक्षक व आरोग्यसेवक म्हणून काम करणा-यांवर कारवाई करून त्यांच्या जागी बेरोजगार उमेदवारांना काम करण्याची संधी देण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून मागणी करण्यात आलेली आहे.
0 Comments