Advertisement

पेसा भरतीसाठी आंदोलक झाले अधिक आक्रमक

२१ ऑगस्टला राज्यभर चक्काजाम आंदोलन 

नाशिक प्रतिनिधी: अनुसूचित क्षेत्रातील (पेसा)१७ संवर्गाची कायम स्वरूपी पदभरती तात्काळ सुरू करा,या मागणीसाठी आदिवासी १७ संवर्ग पेसा पदभरती कृती समिती महाराष्ट्र राज्य तर्फे नाशिक येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणास व जन आक्रोश मोर्चास आदिवासी समाजाने जाहीर पाठिंबा देत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात आंदोलन कर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व आदिवासी विकास विभाग नाशिक कार्यालय समोर रस्ता जाम केला . महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील पेसा १७ संवर्गाची आदिवासी उमेदवारांच्या पदभरतीला मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाला पुढे करत महाराष्ट्र शासनाने स्थगिती दिलेली आहे.परंतु त्या आदेशात पेसा क्षेत्रातील पदभरती करू नये,असे नमूद करण्यात आलेले नाही.तरीही शासनाने पेसा क्षेत्रात आदिवासी उमेदवारांची पदभरती प्रक्रिया बंद केलेली आहे.या क्षेत्रात फक्त बिगर आदिवासी उमेदवारांची पदभरती प्रक्रिया सुरू आहे.त्यामुळे आदिवासी उमेदवारांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बिगर आदिवासी उमेदवारांची भरती करून त्यांना न्याय व आदिवासी उमेदवारांची भरती थांबवून त्यांच्यावर अन्याय सरकार करीत आहे.
                            पालघर जिल्ह्य़ातील बिगर आदिवासी याचिका कर्त्यांनी मा.उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे.त्यानूसार विद्यार्थांच्या भरती प्रक्रियेतील निकालानंतरही नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाहीत. लाखों सुशिक्षित उमेदवार बेरोजगार झालेले आहेत. हजारों उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे.त्यामुळे आदिवासी बांधवांत सर्वत्र नाराजी निर्माण झालेली आहे.बिगर आदिवासींची भरती प्रक्रिया सुरू व आदिवासी उमेदवारांची भरती प्रक्रिया बंद असल्यामुळे आदिवासी उमेदवारांवर शासन दुजाभाव करत फार मोठा अन्याय करीत आहे.शासनाकडून या पदभरतीला जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.ही एक आदिवासी उमेदवारांवर अन्याय करणारी गंभीर बाब आहे.गेल्या २० दिवसांपासून आदिवासी उमेदवारांचे आमरण उपोषण सुरू आहे.उपोषण कर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत आहे,उपोषण कर्ते जीवन मरणाशी झुंज देत आहोत.तरी शासनाकडून मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनुसूचित क्षेत्रातील पेसा १७ संवर्गाची कायम स्वरूपी पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा आदिवासी समाजाकडून दिनांक २१ ऑगस्ट रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments