Advertisement

जन्म मृत्यूची नोंद न करणार्‍या तुळाजा ग्रामपंचायत ग्रामसेवकावर होणार कारवाई; बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे गटविकास अधिकारी तळोदा यांना निर्देश

नंदूरबार प्रतिनिधी: बिलीचापडा येथील व्यक्तींची ग्रामपंचायत तुळाजा येथे जन्म मृत्यूची नोंद केली जात नाही ,नोंद करावी व नोंद न करणा-या ग्रामसेवकाला सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करावी,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून सावनकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांना देण्यात आले.निवेदनाची दखल घेत सावनकुमार यांनी तळोदाचे गटविकास अधिका-यांना लगेच फोन लावला व निवेदनावर तातडीने कारवाई करण्याचे तोंडी निर्देश दिले.पुन्हा बिलीचापडा गांवातील लोकांची ही तक्रार माझ्याकडे येता कामा नये,असे सुनावले.निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,वनसिंग पटले,भोंडा पटले,किसन वसावे,दिनेश वळवी,हाना पटले,सुनील वसावे,जयसिंग वळवी,माधव वसावे आदि कार्यकर्ते नंदूरबार येथे उपस्थित होते.
                        बिलीचापडा येथील व्यक्तींची जन्म मृत्यू नोंद ग्रामपंचायत तुळाजा येथे केली जात नाही,ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.बिलीचापडा हे गांव ग्रामपंचायत तुळाजा अंतर्गत येते.या गांवात सन १९८४ पासून लोक राहत आहेत. या गांवात एकूण ५५ कुटुंब राहत असून एकूण लोकसंख्या २५० आहे.या गांवातील व्यक्तीची जन्म मृत्यूची नोंद ग्रामपंचायत तुळाजा येथे केली जात नसल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे.स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही बिलीचापडा सारख्या गांवातील व्यक्तींची जन्म मृत्यूची नोंद केली जात नाही,ही एक दुर्दैवाची बाब आहे.ग्रामपंचायत मध्ये जन्म मृत्यूची नोंद करण्यात येत नसल्यामुळे येथील रहिवाशांना जन्म मृत्यूचे प्रमाणपत्रही मिळत नाहीत. त्यामुळे येथीलङ लोकांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागते.तसेच बालकांनाही शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.म्हणून बिलीचापडा येथील व्यक्तींची ग्रामपंचायत तुळजा येथे दप्तरी नोंद करण्यात यावी.हीच नम्र विनंती.नोंद न करणा-या संबंधित ग्रामसेवकाला सेवेतून काढून टाकण्यात यावे.तसेच गटविकास अधिकारी तळोदा यांनीही लक्ष न घातल्याप्रकरणी त्यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात यावी.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आलेला आहे.

Post a Comment

0 Comments