Advertisement

धडगांव तालुक्यात योजनांचे पैसे लाभार्थ्यांना दिले जात नाहीत, बिरसा फायटर्स आक्रमक, तहसीलदारांना निवेदन

धडगांव प्रतिनिधी: अक्राणी तालुक्यातील विविध शासकीय योजनांच्या लाभापासून लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात आहे. विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांना मिळत नाहीत, ते त्वरित देण्यात यावेत, अशी मागणी बिरसा फायटर्स तालुका शाखा धडगांव संघटनेच्या वतीने तहसीलदार धडगांव यांच्याकडे करण्यात आली आहे.या वेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा , धडगांव तालुकाध्यक्ष सुनिल तडवी,राहुल भील,अर्जून पावरा,गणेश पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनावर राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदींच्या सह्या आहेत.
                        महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रभर अनेक शासकीय योजना राबविल्या जात आहेत. आपल्या अक्राणी तालुक्यातही वृद्धपकाळ योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्त योजना, विधवा योजना अशा विविध योजना राबविल्या जात आहेत. परंतु या योजनेचे गेल्या ३ ते ४ महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांना मिळाले नाहीत.योजने संबंधित अधिकारी व कर्मचारी हे काही लाभार्थ्यांचे पैसे खात्यावर टाकतात तर काही लाभार्थ्यांचे जाणीवपूर्वक पैसे टाकत नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांच्याकडून उडवी उडवीची उत्तरे दिली जातात. योजनेसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड अपडेट, मोबाईल लिंक करून हयात असलेले दाखले सुद्धा दिलेले आहेत. तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे टाकले जात नाहीत. वृद्ध लोकांना विनाकारण इकडे तिकडे हेलफाटे घालायला लावतात. योजनेसंबंधीत जे अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे टाकत नाहीत, लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक उडवा उडवीची उत्तरे देऊन हेलफाटे घालायला लावतात. त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी व लाभार्थांना योजनेचे पैसे वाटप करून लाभ द्यावा.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments