Advertisement

सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी डीएड, बीएड अहर्ताधारक तरूण बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करा- बिरसा फायटर्सची मागणी

शहादा प्रतिनिधी: नंदुरबार जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांवर डीएड, बीएड अहर्ताधारक बेरोजगार उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती द्या,सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करू नका,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे,तितरी बिरसा फायटर्स गाव अध्यक्ष रवींद्र पावरा,सर्जन पावरा,गोविंद पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                       कक्ष अधिकारी ,महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक १५ जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार व पेसा क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भरतीबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.सदर पत्रात पेसा क्षेत्रातील नियमित भरती होईपर्यंत कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती देण्यात यावी,असे नमूद करण्यात आले आहे.सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२ नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पत्र १५४४ उमेदवारांना मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी,असेही नमूद करण्यात आले आहे. 
                         जिल्ह्य़ात डीएड, बीएड अहर्ताधारक हजारों शिक्षक भरतीसाठी पात्र असताना शासन ५८ वर्षे सेवा केलेल्या निवृत्त शिक्षकांना पेसा भरतीत प्राधान्य देऊन बेरोजगार तरूणांशी खेळ खेळत आहे,असे वाटते.ज्यांना नोकरीची खरी गरज आहे अशा तरूण उमेदवारांना नोकरीत प्राधान्य न देता ज्यांची नोकरी समाप्त झाली आहे,जे नोकरीतून निवृत्त झाले आहेत, अशा रिटायर्ड शिक्षकांना भरतीत प्राधान्य देणे म्हणजे बेरोजगार शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. सेवानिवृत्त शिक्षकांची सेवानिवृत्त झाल्यानंतर विद्यार्थांना शिकवण्यास पाहिजे तेवढी शारिरीक व मानसिक क्षमता नसते.याऊलट सेवानिवृत्त शिक्षकांपेक्षा डीएड, बीएड अहर्ताधारक तरूण शिक्षक हे अधिक उत्साहाने अध्यापनाचे काम करू शकतात.शाळेतील विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नंदूरबार जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांचे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांवर डीएड, बीएड अहर्ताधारक बेरोजगार उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी,सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्यात येऊ नयेत, हीच नम्र विनंती. अन्यथा शासनाच्या या चूकीच्या धोरणांविरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनास दिला आहे.

Post a Comment

0 Comments