Advertisement

सिझेरियन झालेल्या बाळ -बाळंतीण महिलेला ३२ किलोमीटर लांब सोडून पसार झालेल्या चालकास व कर्मचाऱ्यांस सेवेतून काढून टाका: बिरसा फायटर्सची मागणी

शहादा:सिझेरियन झालेल्या 
बाळ-बाळंतिणीला ३२ किलोमीटर लांब सोडून रूग्णवाहिका घेऊन पसार झालेल्या चालकाला व संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून काढून टाका,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जालिंदर पावरा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
                      नंदुरबार येथील शासकीय रूग्णालयात सिझेरियन द्वारे बाळंतीण झालेल्या महिलेला रूग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर घरी सोडण्यासाठी रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.परंतु चालकाने त्या महिलेला घरापर्यंत न पोहचवता गावापासून ३२ किमी अंतरावर असलेल्या धडगांव बाजारात जबरदस्तीने उतरवून दिले.परिणामी पैसे नसल्यामुळे बाळंतीण महिला ४० अंश तापमानात रडत बसली.ही एक निंदनीय घटना आहे.माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे.सातपुड्यातील नर्मदा काठावरील माळ येथील रहिवाशी असणा-या रिना विलास पावरा ही महिला प्रसुतीसाठी नंदुरबार जिल्हा रूग्णालयात दाखल झाली होती.सहा दिवसांपूर्वी सिझेरियन प्रसुती झाल्यानंतर तिला व तिच्या बाळाला गावापर्यंत न सोडता मध्येच धडगांव बाजारात उन्हात तान्हात सोडण्यात आले.
                     एक महिन्यापूर्वी अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा या आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी जाणा-या एका गर्भवती महिलेचा रूग्णवाहिका बंद पडल्याने दूर्दैवी मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असताना पुन्हा अशी घटना घडणे लाजिरवाणी बाब आहे. नंदूरबार जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणेत सुधारणा न होता दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.त्यास आरोग्य विभागातील कर्मचारी जबाबदार आहेत. या बाळ बाळंतीण महिलेला गावापासून ३२ किलोमीटर अंतरावर सोडून रूग्णवाहिका घेऊन पसार झालेल्या चालकाला व संबंधित जबाबदार असणा-या कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात यावे.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments