Advertisement

खांडबारा आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेच्या अभावी एकाचा मृत्यू;रात्री डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी राहत नसल्याची बिरसा फायटर्सची तक्रार

नवापूर:प्राथमिक आरोग्य केंद्र खांडबारा येथे १०८ रूग्णवाहिकेची तात्काळ सोय करा व डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी २४ तास उपलब्ध राहावेत, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या मागणीचे निवेदन तहसीलदार नवापूर यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,गोपाल भंडारी,गाव अध्यक्ष राहूल चव्हाण,रवि पावरा,बिरबल पावरा,राहुल सुळे,प्रविण पावरा,करन सुळे,हिरामण खर्डे,गोविंद सुळे,महेंद्र माळी,अभय ठाकरे,रविन पावरा,मंगेश मोरे,सुरसिंग डुडवे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                  प्राथमिक आरोग्य केंद्र खांडबारा येथे १०८ रुग्णवाहिकेचे सोय नाही.१०२ रूग्णवाहिका असून ती नादुरुस्त आहे.त्यामुळे जरीपाडा येथील रूग्णाच्या उपचारासाठी रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे खांडबारा सरपंच यांच्या खाजगी गाडीतून सरकारी जिल्हा रूग्णालय नंदूरबार येथे नेताना रूग्णाचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे.१०८ रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे रूग्णांची गैरसोय होऊन मृत्यू होत आहेत.तसेच या आरोग्य केंद्रात २४ तास आरोग्य कर्मचारी व डाॅक्टर राहत नाहीत.रात्री डाॅक्टर उपलब्ध राहत नाहीत. त्यामुळे आरोग्य सेवा व सुविधांपासून येथील रूग्ण वंचित राहत आहेत. म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र खांडबारा येथे तात्काळ १०८ रूग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी व आरोग्य केंद्रात २४ तास डाॅक्टर व आरोग्य सेवक राहतील, याबाबत निर्देश द्यावेत.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments