*बिरसा फायटर्सच्या निवेदनाची दखल;चौकशी सुरू*
नंदूरबार:अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसुतीसाठी गेलेल्या गर्भवती माता कविता राऊत यांचा बंद रुग्णवाहिकेमुळे व हलगर्जीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून काढून टाका,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी,करण सुळे,धनायुष भंडारी,पवन सुळे,रमेश पटले,रवींद्र नावडे, भावसार मोते,चिका भोसले,धना ठाकरे,रायमल पवार, करण पटले,भाईदास चव्हाण, मांगीलाल पावरा,शशिकांत पावरा,दिलवरसिंग पाडवी,हारसिंग भील,फेंदा वळवी,फुलसिंग वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी बर्डी येथील गर्भवती माता कविता मगन राऊत (१९) गेल्या असता त्यांना त्रास होत असल्याने पिंपळखुटा येथून मोलगी येथे नेण्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आली. मात्र, पिंपळखुटा ते मोलगीदरम्यान सुरगस जवळ संबंधित रुग्णवाहिका बंद पडली. तब्बल तासभर सुरु न झाल्याने मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. यादरम्यान, त्यांची प्रकृती खालावली. यामुळे मोलगी येथून दुसरी रूग्णवाहिका येईपर्यंत उशीर झाला. यानंतर पर्यायी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेले असता मातेचा मृत्यू झाला.
राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावितांच्या नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम- अतिदुर्गम भागात आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेचे बळी गेल्याच्या घटना नवीन नाहीत. एका बाजूला गतिमान शासनाचा दावा केला जात असला तरी रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याने अक्कलकुवा तालुक्यात झालेला मातेचा मृत्यू शासनाच्या दाव्यावर आणि विकासाच्या थापांवर झणझणीत अंजन भरणारा आहे. या घटनेमुळे मात्र आरोग्य यंत्रणेचे खरेखुरे वास्तव समोर आले असून प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत.
महिला व बालकल्याण विभागामार्फत औषध खरेदीसाठी तब्बल ५ कोटी दिले जातात, हा पैसा जातो कुठं? करोडो रूपये आरोग्य विभागाला मिळत असूनही जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था बिघडलेली आहे.तरी
गर्भवती मातेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात यावे,ही विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा प्रशासनास देण्यात आला आहे.
0 Comments