आरोपींना अटक न केल्यास शहादा पोलिसांवरील जनतेचा विश्वास उडेल: सुशिलकुमार पावरा
शहादा: औरंगपूर येथील आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण करणा-या लड्डू पाटील व त्यांच्या साथीदारांवर गुन्ह्याचे कलम वाढवून तात्काळ अटक करावी ,या मागणीसाठी आजच्या आदिवासी समुदायाच्या आक्रोश मोर्चाची दखल न घेतल्यास मा.पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार समोर विराट मोर्चा व आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन मोर्चा स्थळी आदिवासी समाजातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार व पोलीस निरीक्षक शहादा शिवाजी बुधवंत यांना देण्यात आले. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, गोपाल भंडारी, भारतीय ट्रायबल टायगर सेनेचे सतीश ठाकरे,जय आदिवासी ब्रिगेडचे अनिल पावरा,भरोसा मोरे,रावण ग्रूपचे विशाल पावरा, सरपंच एकनाश वळवी,उपसरपंच आनंद शेवाळे,जमन ठाकरे,दिलवरसिंग पावरा, वसंत चौधरी,सुरेश ठाकरे,ललित शेवाळे,लखन वळवी,शैलेश पाडवी आदि आदिवासी संघटनांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील ६ पेक्षा अधिक आदिवासी मुलांना हरभ-याच्या शेंगा खायला तोडल्या म्हणून राग येऊन मामा मोहिदा येथील लड्डू पाटील व त्यांच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली आहे,मारहाणीत मुलांचे तोंड सुजले, कपडे फाटले व शरिराच्या इतर अवयवांना जबर दुखापत झाली आहे. आरोपींविरुद्ध भा.द.वि.क. ३२३,५०४ सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (1)(R)(S),3(2)(VA) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपी हे पाटील समाजाचे असल्याकारणाने गुन्ह्याचे कलम वाढवण्यास व आरोपींना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत, म्हणून आदिवासी समुदायातर्फे दिनांक २ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा( मा.प्रांतअधिकारी कार्यालय ) पासून ते मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय शहादा जि.नंदुरबार पर्यंत आक्रोश मोर्चा आयोजन करण्यात आले.मोर्चा स्थळी पोलिसांनी मोर्चेक-यांशी संवाद साधला.त्यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा पोलिसांना म्हणाले की,पोलिसांनी आरोपी लड्डू पाटील व त्यांच्या साथीदारांना न अटक केल्यास शहादा पोलिसांवरील जनतेचा विश्वास उडेल. आजच्या मोर्चाची दखल न घेतल्यास पुढील विराट मोर्चा व आंदोलन हे मा.पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार समोर काढण्यात येणार आहे.त्यास सर्वस्वी जबाबदार मा.उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार व मा.पोलीस निरीक्षक शहादा शिवाजी बुधवंत हे राहतील, याची नोंद घ्यावी.असा इशारा मोर्चेकरी आदिवासी बांधवांनी दिला आहे.या प्रकरणात आदिवासी समाज एकवटला असून राजकीय पक्षांचे आदिवासी पुढारी,लोकप्रतिनिधी लांबच दिसत आहेत,म्हणून आरोपींना वाचवण्यात या पुढा-यांचाही हात असल्याचे लोक उलट सुलट चर्चा करीत आहेत.
0 Comments