Advertisement

बिरसा फायटर्सचा दणका,गटविकास अधिका-यांनी दिले चौकशीचे आदेश

*शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ४ हजार रूपये घेणे पिटीओला भोवणार* 

शहादा: मनरेगा अंतर्गत विहीर सिंचन मंजूर कामात प्रत्येकी ४ हजार रूपये संबंधित अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांकडून मागून भ्रष्टाचार करीत असल्याबाबतची तक्रार बिरसा फायटर्स संघटनेने पंचायत समिती शहादाचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली.त्यानंतर गटविकास अधिकारी राजेंद्र घोरपडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.पंचायतचे विस्तार अधिकारी बीके पाटील यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.संदीप गोवळे पीटीओ यांच्याबद्दल तक्रार झाली असून पीटीओला पदावरून हटविण्याचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले आहे.
                   शासनाच्या मनरेगा योजनेअंतर्गत आपल्या शहादा तालुक्यात प्रत्येक गावातील लोकसंख्येनुसार २५ ते ३० विहिरी सिंचन मंजुरी मिळाली आहे .लाभार्थी शेतकऱ्यांकडून शेतपाहणी करून जागेचा फोटो काढण्यासाठी १ हजार रूपये व जिओ टेकींगसाठी ३ हजार रुपये असे एकूण ४ हजार रूपये संबंधित कर्मचारी घेत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.मनरेगा योजनेंतर्गत कामात प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे.शेतकऱ्यांकडून पैसे उकडणा-या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला.
            यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,गोपाल भंडारी ,करन पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments