Advertisement

खोटे जात प्रमाणपत्र देणा-यांवर व घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा: बिरसा फायटर्सची मागणी

शहादा: अनुसूचित जमातींचे खोटे जात प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर व देणा-यांवर कायदेशीर कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे ,गोपाल भंडारी,सोमनाथ पावरा,महेश प्रधान ,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
                         राज्यात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्यांच्या स्थापनेपासून नोव्हेंबर २०२३ पर्यंत जात प्रमाणपत्र तपासणीसाठी ७ लाख ११ हजार ६५२ दावे दाखल करण्यात आले.यापैकी ६ लाख २६ हजार २०० जात प्रमाणपत्रे वैद्य ठरली आहेत, तर ३७ हजार ५९९ दावे अवैध ठरली आहेत. इतर कारणांनी निकाली काढलेली प्रकरणांची संख्या ३० हजार ७५० आहे.जात पडताळणी समित्यांनी निकाली काढलेले दावे ६ लाख ९४ हजार ५५० आहेत, तर प्रलंबित जात प्रमाणपत्र दावे १७ हजार १०२ आहेत.
                    महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीच्या प्रमुख जमाती ४७ होत्या.त्यापैकी २ जमाती वगळण्यात आल्या आहेत. आता फक्त ४५ जमाती आहेत. या ४५ मुख्य जमातीच्या उपजातींसह एकूण १८१ जमातीची संख्या आहे.यातील काही जमातींमध्ये मोठ्या प्रमाणात मूळ जमातीच्या नामसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन आदिवासींच्या सवलती घेतल्या जात आहेत. यामुळे आदिवासींना संविधानाने दिलेले ७ टक्के आरक्षणाचा फायदा झालेलाच नाहीत. अनेक भागात आदिवासी बांधव विकासापासून अजूनही वंचित आहेत. 
                 महाराष्ट्र राज्य,अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी कायदा २००० हा बोगस जात प्रमाणपत्रावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तयार केलेला आहे.परंतु खोटे जात प्रमाणपत्र देणा-यांवर व घेणा-यांवरही कारवाई केली जात नाही.ही अत्यंत गंभीर बाब आहे.म्हणून अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी कायदा २००० नुसार खोटे जात प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर व देणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत व त्यांना अटक करण्यात यावी.तसेच त्यांनी आतापर्यंत खोट्या जात प्रमाणपत्रावरून घेतलेले शासनाचे आर्थिक लाभ व्याजासह वसूल करण्यात यावेत. हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनास दिला आहे.

Post a Comment

0 Comments