Advertisement

सत्ता बदलण्यासाठी ११ आदिवासी संघटनांची युती

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार:सुशिलकुमार पावरा

शहादा: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक २०२३- २०२४ साठी नंदूरबार व धुळे जिल्ह्यात प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांना बदलण्यासाठी ११ आदिवासी संघटनांनी युती केली आहे.याबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक ३ सप्टेंबर रोजी बिरसा फायटर्स संघटनेने झूम मिटींग आयोजित केली होती.या मिटींग मध्ये बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,आदिवासी एकता परिषदचे सुरजित ठाकरे,आदिवासी टायगर सेनेचे प्राध्यापक सा-या पाडवी,आदिवासी पावरा समाज संघाचे संजय पावरा,बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष मनोज पावरा,महासचिव राजेंद्र पाडवी,धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,नंदूरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा,डाॅक्टर असोसिएशनचे डाॅक्टर रविंद्र पावरा व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
               या युतीत बिरसा फायटर्स( २०० शाखांसह),आदिवासी एकता परिषद, जयस,एकलव्य जनता पार्टी, महाराष्ट्र ट्रायबल आघाडी,भील प्रदेश मोर्चा, पावरा समाज संघ महाराष्ट्र राज्य,अपंग कामगार संघटना,आदिवासी पारधी समाज संघटना महाराष्ट्र राज्य, एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य इत्यादी ११ आदिवासी संघटनांचा समावेश आहे.
              कोणताही राजकीय पक्ष ( आदिवासी पक्ष सोडून) आपली आदिवासी विचारधारा स्वीकारत नाही.आजपर्यंत आपण प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना निवडून देऊन त्यांची गुलामगिरी स्वीकारत आलो आहोत.त्यामुळे आपल्या आदिवासी समाजाच्या मूळ समस्या जैसे थे च आहेत. म्हणून आता प्रस्थापित पुढा-यांना व राजकारण्यांना निवडून द्यायचे नाही,ज्यांच्याकडे करोडो रूपये आहेत,त्यांना निवडून द्यायचे नाही,जो उमेदवार व पक्षवाले मतांसाठी पैसे वाटतात, त्यांना निवडून द्यायचे नाही,सर्वसामान्य, पोटतिडकीने समाजासाठी काम करणा-या व आदिवासी विचारधारा स्वीकारणा-या सामाजिक संघटनांच्या उमेदवारांनाच आगामी निवडणुकीत निवडून देण्यासाठी नंदूरबार व धुळे जिल्ह्य़ातील आदिवासी सामाजिक संघटनांची युती करण्याचे ठरविले आहे,
            दिवसेंदिवस आदिवासींवर अन्याय व अत्याचार वाढतच आहेत, तरीही आदिवासींच्या या गंभीर समस्यांवर प्रस्थापित पक्षाचे आदिवासी आमदार, खासदार व मंत्री एक शब्दही बोलताना दिसत नाहीत.त्यासाठी राजकीय परिवर्तन घडवून आणणे ही आदिवासींसाठी आजची एकमेव गरज बनली आहे.म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाच्या( आदिवासी पक्ष सोडून) उमेदवाराला मतदान करायचे नाही,निवडून द्यायचे नाही ,फक्त आदिवासी सामाजिक संघटनांच्या ठरवलेल्या अपक्ष उमेदवारालाच मतदान करून निवडून द्यायचे,असा संकल्प आम्ही करीत आहोत. नंदूरबार व धुळे या २ जिल्ह्य़ातील लोकसभेचे २ खासदार व विधानसभेचे ८ आमदार असे एकूण १० अपक्ष उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प आम्ही सामाजिक संघटना करीत आहोत.
         चला सामाजिक संघटनांची ऐकी करूयात व राजकीय परिवर्तनाचे साक्षीदार होऊया!असे आवाहन बिरसा फायटर्स संघटनेचे अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी नंदूरबार व धुळे जिल्ह्य़ातील आदिवासी मतदारांना केले आहे.

Post a Comment

0 Comments