गटविकास अधिकारी,आरोग्य अधिकारी,पोलीस निरीक्षक यांना निवेदन;17 जुलैला ठिय्या आंदोलन
शहादा: वडगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत,या मागणीसाठी संघटनेच्या ठिय्या आंदोलन करणार असल्याबाबतचे निवेदन बिरसा फायटर्स संघटनेकडून शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे,तालुका आरोग्य अधिकारी वळवी,शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,वडगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स गाव शाखा वडगाव तर्फे दिनांक 16/11/2022 व दिनांक 19/01/2023 रोजी आपणास देण्यात आले होते.परंतु अद्यापही वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरण्यात आलेली नाहीत.मागील काही वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव येथे नर्स,आरोग्य सेवक ही पदे रिक्त असल्यामुळे गावातील रूग्णांना वेळेवर प्रथम औषधोपचार मिळत नाहीत. परिणामी डेंग्यू,मलेरिया,हगवण इत्यादी अनेक आजारांचा गावक-यांना सामना करावा लागत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्राथमिक उपचारासाठी व गरोदर स्त्रियांना प्रसुतीसाठी गावात खाजगी दवाखानाही नसल्यामुळे गावातील रूग्णांना उपचाराची गैरसोय निर्माण झाली असून लांबच्या ठिकाणी नाईलाजाने उपचारासाठी जावे लागते.त्यात रूग्णांना वेळ व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.प्रशासनाने वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरल्यास रुग्णांच्या उपचारासंबंधीत अनेक समस्या सुटतील व परिसरातील गरीब रूग्णांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होईल.गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही रिक्त पदांमुळे आरोग्य केंद्र नसल्यासारखे झाले आहे.तरी प्रशासनाने वडगाव तालुका शहादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरित भरावीत, या मागणीसाठी दिनांक 17 / 07/2023 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्य अधिकारी शहादा कार्यालयासमोर बिरसा फायटर्स संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.तरी ठिय्या आंदोलनास परवानगी मिळावी.
निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नंदुरबार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,पवन पावरा,संतोष पावरा,मुकेश पावरा,बिरबल पावरा,करण पावरा,पुष्कराज पावरा आदि वडगाव शाखेतील कार्यकर्ते उपस्थित होते.बिरसा फायटर्सच्या आक्रमतेमुळे मागणीबाबत प्रशासकीय स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
0 Comments