Advertisement

मणिपूर येथील २ आदिवासी महिलांवर अत्याचार करणा-यां सर्व आरोपींना फाशी द्या: बिरसा फायटर्सची मागणी


राष्ट्रपती व पंतप्रधान यांना तहसीलदारांमार्फत निवेदन

शहादा: मणिपूर राज्यातील कांगपोकपी येथील २ आदिवासी महिलांना निर्वस्त्र करत धिंड काढणा-या जमावातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,पंतप्रधान नरेंद्र मोदी व मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले.निवेदन देतेवेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राणीपूरचे बुकलाल पावरा, उदाम पावरा, धरमसिंग पावरा, किर्तन पावरा
आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
             निवेदनात म्हटले आहे की,मणिपूर राज्यातील कांगपोकपी येथील एका जमावाने २ आदिवासी महिलांना निर्वस्त्र करत सामुहिक बलात्कार करून रस्त्यावर धिंड काढल्याचा विडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.सदर घटना धक्कादायक असून अमानवीय आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो.या घटनेबद्दल आदिवासी समाजात प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.घटना ४ मे २०२३ रोजीची असून उघड व्हायला तब्बल ७७ दिवस लागले.२१ जूनला गावच्या सरपंचाने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतरही घटनेची वाच्यता फुटायला २ महिने लागले.मैतई समुदायाच्या तब्बल ८०० ते १००० लोकांच्या जमावाने महिलांच्या कुटुंबियांवर हल्ला करत महिलेचा भाऊ व वडिलाची हत्या केली.त्यानंतर निर्वस्त्र व्हा ,नाहीतर जीवे ठार मारून टाकू! असं म्हणत हजारो लोकांच्या जमावाने २ महिलांना निर्वस्त्र करत त्यांच्या गुप्तांगात हात घालत रस्त्यावर निर्वस्त्र धिंड काढली व त्यापैकी २१ वर्षाच्या एका मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याचाही आरोप आहे.मणिपूरची ही घटना सहन करण्यापलीकडची आहे.आम्हाला हे दृश्य पाहून धक्काच बसला असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.राज्य सरकारकडून याबाबत तात्काळ अहवाल मागवत २८ जुलैला सुनावणी ठेवली आहे.राज्य व केंद्र सरकारने यावर कारवाई नाही केली तर आम्हाला यावर दखल घ्यावी लागेल,अशी तंबीही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिली आहे.
         मणिपूरची ही घटना उघड व्हायला तब्बल ७७ दिवस लागले आहेत व घटना उघड झाल्यानंतर फक्त एका आरोपीला अटक करण्यात आली आहे,यावरून सदर घटना सरकारने व पोलीस प्रशासनाने दाबून ठेवल्याचाही संशय निर्माण होतो.या घटनेबद्दल देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.नैतिकतेची जबाबदारी घेत मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा देणे आवश्यक आहे व मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट दिवसेंदिवस आदिवासींवर अत्याचार वाढतच चालले आहेत.आदिवासींवर होणारे हे अत्याचार थांबविण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,म्हणून मणिपूर येथील २ आदिवासी महिलांवर अमानवीय कृत्य करणा-या जमावातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून जलद न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटना व संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशाराही बिरसा फायटर्स संघटनेने सरकारला दिला आहे.

Post a Comment

0 Comments