Advertisement

जिल्हा बदली शिक्षकांचे समुपदेशन तात्काळ करा: बिरसा फायटर्सची मागणी

समुपदेशनास शिक्षक संघटनांचा छुपा विरोध 

फक्त लढा शिक्षक संघटना आली सोबतीला

नंदुरबार:जिल्हांतर्गत बदली शिक्षकांचे समुपदेशन तात्काळ सुरू करा व शिक्षकांना दररोज जिल्हा परिषदला हजेरीसाठी न बोलवता समुपदेशनाच्या दिवशीच बोलवा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.प्रशासकीय अधिका-यांशी याबाबत 10 मिनिटे चर्चा करण्यात आली.काही शिक्षकांनी आपल्या अडचणी अधिका-यांना सांगून दाखवल्या.लहान बाळ घेऊन आलेल्या महिला शिक्षिकेस जिल्हा परिषदला दररोज न येण्याबाबतची सवलत देण्याबाबतचा तात्काळ विचार करू व अन्य शिक्षकांबाबत सीईओ साहेब निर्णय घेतील,असे संबंधित अधिका-यांनी बिरसा फायटर्सला आश्वासन दिले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा ,रविंद्र वसावे,कपिल पावरा,मानसिंग वळवी,अमरसिंग पाडवी,मनाली वळवी,पिंगला रावताळे,मंगला पावरा,बिंदू पावरा इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
                 जिल्हांतर्गत बदली होऊन सिंधुदुर्ग, रत्नागिरी,सांगली,सातारा इत्यादी जिल्ह्यातून आपल्या नंदुरबार जिल्हा परिषद ला दिनांक 29/04/2023 ते दिनांक 03/05/2023 या कालावधीत बरेच शिक्षक हजर झालेले आहेत. सदर शिक्षकांना धडगांव, अक्कलकुवा,शहादा,नवापूर इत्यादी तालुक्यातील दुर्गम भागातील आपल्या मूळ गावांतून जिल्हा परिषदला हजेरी लावण्यासाठी दररोज यावे लागत आहेत. नंदुरबार पासून धडगांव, अक्कलकुवा तालुक्यातील गांवांचे अंतर 150 किलोमीटर पेक्षा अधिक लांब आहे. वाहतूकींच्या गैरसोयींमुळे सदर शिक्षकांना दररोज जिल्हा परिषदला येणे त्रासदायक ठरत आहे.म्हणून लवकरात समुपदेशन करून जिल्हा बदली शिक्षकांना रिक्त शाळांवर हजर करून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच जिल्हा परिषद शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. सुट्ट्यांत शिक्षकांना दररोज जिल्हा परिषदला हजेरीला बोलावणे उचित ठरत नाही.
                      म्हणून शिक्षकांच्या वरील अडचणींचा विचार करून समुपदेशन लवकरात लवकर करण्यात यावे.अथवा समुपदेशनाची तारीख निश्चित होत नाही,तोपर्यंत शिक्षकांना हजेरीसाठी जिल्हा परिषदला बोलावण्यात येऊ नये.समुपदेशनाच्या दिवशीच सदर जिल्हा बदली शिक्षकांना बोलावण्यात यावे.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून सीईओ व शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
              दरम्यानच्या काळात शनिवारी काही शिक्षक संघटनांनी अवघड क्षेत्रात काम करणा-या आधीच्या शिक्षकांना सुगम क्षेत्रात समावेश करा व नंतर जिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना रिक्त झालेल्या अवघड क्षेत्रातील शाळांवर नियुक्त करा,अशी जिल्हा बदली शिक्षकांविरोधातच मागणी केल्याची खळबळजनक बातमी शिक्षकांना समजली.त्यामुळे सोमवारी जिल्हा परिषद आवारात अशा शिक्षक संघटनांच्या विरोधात बदली शिक्षकांचा नाराजीचा सूर दिसून आला.जिल्हा बदली शिक्षकांच्या समुपदेशनाच्या विरोधात व स्वार्थासाठी नियमबाह्य मागणी करत काही शिक्षक संघटना प्रशासनावर दबाव आणत असतील तर अशा शिक्षक संघटनांसोबत भविष्यात आपण राहायचे नाही,ज्या शिक्षक संघटना आपली बाजू मांडतील, त्या संघटनांसोबत राहायचे,असा निर्धार शिक्षकांनी केला.फक्त लढा शिक्षक संघटना बदली शिक्षकांच्या समुपदेशनासाठी व दररोज जिल्हा परिषद नंदुरबारला बोलावू नये,म्हणून शिक्षकांच्या बाजूने निवेदन दिल्याचे वृत्त हाती आले आहे.

Post a Comment

0 Comments