Advertisement

आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची बिरसा फायटर्सची मागणी

आर्थिक परिस्थितीमुळे डाॅक्टर व इंजिनिअर होता येत नाही- सुशिलकुमार पावरा


दापोली: आदिवासी विद्यार्थ्यांना नीट व जेईई परीक्षेचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, आयुक्त राजेंद्र भारूड, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
                   निवेदनात म्हटले आहे की,डॉक्टर, इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना नीट,जेईई या पात्रता परीक्षा द्यावी लागते. मात्र या परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना क्लासेस लावावे लागतात.या क्लासेसचा खर्च वर्षाला 2 ते 3 लाख रूपये येतो.आदिवासी विद्यार्थी लाखोंचा एवढा खर्च कोठून करणार?असा प्रश्न निर्माण होतो.कारण आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाकीची असते.बहुतेक पालक हे शेतमजूरी करतात. आपल्या जीवनाचा गाळा कसाबसा ढकलत असतात. मुलांचे शिक्षण हे आदिवासी आश्रमशाळेत व आदिवासी वस्तीगृहाच्या आधारे चाललेले असते.पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी व डाॅक्टर ,इंजिनिअर होण्यासाठीचा खर्च त्यांना परवडणारा नसतो.
                  आर्थिक परिस्थितीमुळेच इच्छा असूनही डाॅक्टर व इंजिनिअर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहते.म्हणून महाज्योतीच्या धर्तीवर टीआरटीआयनेही आदिवासी विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी द्यावी लागणारी नीट, जेईई पात्रता परीक्षेच्या तयारीकरिता पूर्व परीक्षा मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात यावे,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments