Advertisement

जामगे - विसापूर येथील स्मशानभूमीचा प्रश्न न सोडवल्यास आमरण उपोषणास बसू: कामगार नेते प्रविण घाग

आम्ही आमच्या अंगणात प्रेत जाळायचे का? आंदोलन कर्त्यांचा संतप्त सवाल

दापोली: जामगे- विसापूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणा-या बेंद्रेवाडी,कातकरवाडी,नवानगर कातकरवाडी व जामगे हद्दीतील कातकरवाडी या चार वाडीसाठी जामगे- विसापूर लघुपाटबंधारे योजनेसाठी संपादित केलेल्या धरणाच्या खालील बाजूस शिल्लक जागेमध्ये स्मशानशेड बांधण्यास परवानगी मिळणे या मागणीसाठी 17 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय कार्यालय समोर बिरसा फायटर्स संघटनेच्या बॅनरखाली जामगे- विसापूर या गांवातील आदिवासी व कुणबी समाजातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ठिय्या आंदोलन केले. 
                           कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय, स्मशानभूमी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आमच्या मागण्या पूर्ण करा,नाहीतर खुर्च्या खाली करा,बिरसा मुंडा की जय,बिरसा फायटर्स जिंदाबाद, आदिवासी व कुणबी समाज एकतेचा विजय असो,अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी प्रांत कार्यालय व पंचायत समिती परिसर दणाणून सोडले.कामगार नेते प्रविण घाग यांनी आपल्या बुलंद आवाजात घोषणा दिल्या व विसापूर जामगे गांवातील स्मशानभूमीचा प्रश्न न सोडवल्यास आम्ही आमरण उपोषणास बसू! आम्ही आमच्या अंगणात प्रेत जाळायचे का? अशी आक्रमक पवित्रा घेत प्रविण घाग यांनी अधिका-यांना धारेवर धरले.
              दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन संबंधित उपविभागीय जलसंधारण अधिकारी दापोली यांना बोलावून आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी प्रांत कार्यालयात बोलावले.चर्चे दरम्यान मृदा व जलसंधारण विभागातील अधिकारी व आंदोलन कर्ते यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.जलसंधारण व मृदा विभागातील अधिका-यांनी स्मशानभूमीसाठी जागा देता येणार नाही,अशी एकतर्फी ताठ भूमिका घेतल्यानंतर आंदोलन कर्ते यांनी आक्रमक भूमिका घेतली.त्यानंतर तहसीलदार वैशाली पाटील यांनी स्मशानशेड बांधण्यासाठी धरणाच्या रस्त्याच्या कोपऱ्यातील जागेचा सर्वे करून विसापूर जामगे गांवातील या ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी 3 गुंठे जागा प्रस्तावित करावी,तसा 7 दिवसांत अहवाल सादर करावा,असे निर्देश संबंधित मृद व जलसंधारण विभागातील अधिका-यांना दिले.उपविभागीय अधिकारी साठी विद्याधर वैशंपायन व तहसीलदार वैशाली पाटील यांना बिरसा फायटर्स तर्फे मागणीचे निवेदन देण्यात आहे.
            यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,कामगार नेते प्रविण घाग,जामगे कातकरवाडी प्रमुख कृष्णा हिलम, इक्बाल मालवणकर गांव तंटामुक्त अध्यक्ष जामगे,सुनिल दळवी सामाजिक कार्यकर्ते,स्मिता पाटील सरपंच, ननुषा हिलम,भिकाजी तांबट आदि पुरूष, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            तहसीलदार वैशाली पाटील यांनी स्मशानभूमासाठी जागेचा पर्यायी मार्ग काढला आहे व तसे संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत,असे कार्यालय बाहेर येऊन आंदोलन कर्त्यांची समजूत काढली.त्यानंतर आंदोलन कर्त्यांनी तहसीलदार यांचे आभार मानले.ठिय्या आंदोलन आयोजक बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांचेही ग्रामस्थांनी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.अनुचित प्रकार घडू नये म्हणून आंदोलन स्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments