Advertisement

दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या 'बहर' युवा महोत्सवाची उत्साहात सांगता

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये 'बहर' युवा महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. ह्या वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली त्यामुळे या युवा महोत्सवाची थीम 'आझाद हिंद' अशी ठेवण्यात आली होती.
     या मध्ये ब्लॅक अँड व्हाईट डे, जीन्स अँड कॅप डे, ट्विन्स डे, नो व्हेइकल डे, प्रादेशिक पेहेराव दिवस, सारी डे, टाई डे असे विविध दिवस साजरे करण्यात आले. नो व्हेइकल डे च्या दिवशी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे वैयक्तीक वाहन न वापरता पर्यावरण रक्षणामध्ये आपला खारीचा वाटा उचलला. विविध डेज साजरे करताना विद्यार्थी गट करून त्या त्या दिवसांचे वैशिष्ट्य छोट्या छोट्या कलाकृतीतून सादर करतात. त्या सादरीकरणाच्या कौशल्यावर आधारित त्यांना पारितोषिके देण्यात येतात. यावर्षी यात एकूण ७ गटांनी सहभाग घेतला होता व त्यामध्ये Fab Four या गटाला प्रथम पारितोषिक मिळाले.
   त्याच बरोबर कथालेखन, वक्तृत्व, वादविवाद, मेहंदी, पोस्टर मेकिंग, छायाचित्रण, रांगोळी इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सैमिन उपाध्येला वक्तृत्व स्पर्धेत प्रथम तर सदफ गोठेकरला कथालेखन स्पर्धेत प्रथम आणि रसिका बर्वे आणि अनिरुद्ध भागवतला वादविवाद स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.
   युवा महोत्सवा निमित्त घेतलेल्या मैदानी खेळांच्या स्पर्धामध्ये थाळीफेक, गोळा फेक, भाला फेक या वैयक्तीक स्पर्धांबरोबरच कबड्डी, व्हॉलीबॉल आणि बॉक्स क्रिकेट या सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा विद्यार्थी आणि विद्यार्थीनी दोघांसाठी घेण्यात आल्या. मैदानी खेळांच्या स्पर्धांमध्ये कु. मानसी शिगवण हिला थाळीफेक आणि गोळाफेक मध्ये प्रथम तर कु. शुभम भुवडला गोळा फेक मध्ये, कु. राज वेदकला थाळी फेक मध्ये, कु. साहिल वायंगणकरला भाला फेक मध्ये प्रथम क्रमांक मिळाला. कबड्डी स्पर्धेत द्वितीय वर्ष विज्ञानच्या पुरुष व महिला या दोन्ही संघानी प्रथम क्रमांक पटकावला. तर व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष गटात द्वितीय वर्ष वाणिज्य तर महिला गटात द्वितीय वर्ष विज्ञान चा संघ प्रथम स्थानावर विराजमान झाला. विद्यार्थिनिंच्या क्रिकेट स्पर्धेत प्रथमवर्ष विज्ञान चा संघ तर विद्यार्थ्यांच्या क्रिकेट स्पर्धेत द्वितीय वर्ष वाणिज्यच्या संघाने प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. या वर्षी स्पोर्ट्समन ऑफ दि इयर पुरस्कार प्रथम वर्ष विज्ञानचा विद्यार्थी अझलन काद्री याने पटकावला. याच काळात महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments