*पत्रकार हा समाजाचा खरा चेहरा: सुशिलकुमार पावरा*
*बातम्यांमुळे मला अनेक प्रकरणांत न्याय मिळाला : सुशिलकुमार पावरा*
दापोली: दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने दापोली येथील दैनिक रत्नागिरी टाईम्सच्या कार्यालयात दापोलीतील पत्रकार बांधवांतर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दैनिक पुढारीचे पत्रकार प्रविण शिंदे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर दैनिक लोकमतचे पत्रकार शिवाजी गोरे,रत्नागिरी टाईम्सचे पत्रकार यशवंत कांबळे,आदिवासी न्यूजचे पत्रकार सुशिलकुमार पावरा व पत्रकार सागर गोसावी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला फुले वाहून पूजन केले.
आज मराठी पत्रकार दिन आहे. महाराष्ट्र शासनाने 6 जानेवारी हा दिवस वृत्तपत्राचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन म्हणून घोषित केला.बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. दर्पण या मराठी वृत्तपत्राद्वारे बाळशास्त्री जांभेकर यांनी देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. इंग्रजी सत्ताधा-यांना स्थानिक जनतेच्या अडचणी व भावना कळाव्यात,म्हणून दर्पण मध्ये बाळशास्त्री जांभेकर हे एक स्तंभ इंग्लिश मध्ये लिहत होते.वृत्तपत्रांचे महत्त्व सर्वसामान्य जनतेमध्ये हळूहळू रुजायला लागले.वृत्तपत्रांमधील विचार रुजले व वाचकांचा प्रतिसादही वाढू लागला.ब्रिटीश काळामध्ये वृत्तपत्र चालवणे व वाचक मिळवणे हे मोठे कठीण काम होते.तरीही बाळशास्त्री जांभेकर सारख्या सुधारकांनी पदरमोड करून व नफ्याचे तत्व न स्वीकारता आपले वृत्तपत्र चालवले.1832 मध्ये सुरू केलेले दर्पण हे वृत्तपत्र 1840 पर्यंत चालले.
वृत्तपत्र हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे.दैनिक लोकमत, रत्नागिरी टाईम्स,पुढारी,सागर,प्रहार,सकाळ, तरूण भारत,लोकसत्ता ही मराठी वृत्तपत्रे आजही वाचक आवडीने वाचतात.वृत्तपत्रांनी आजही आपला समाजाभिमुख चेहरा व विश्वासार्हता जपली आहे.हे काम करणारा पत्रकार समाजाचा खरा चेहरा आहे.. वृत्तपत्रे लोकशाहीची मूल्ये जनमाणसात रूजवण्याचे काम करत आहेत. वृत्तपत्रांतील छापील शब्दांवर विश्वास ठेवणारी मंडळी आजही आहेत. वृत्तपत्रात जे छापले आहे ते सत्य आहे,पवित्र आहे,अशी दृढ भावना आजही लोकांत आहे.त्यामुळे देशात माध्यम क्षेत्रात उलथापालथ झाली असली तरी वृत्तपत्रांबद्धल आदर व आब अजूनही लोकांमध्ये कायम आहे.आजही वृत्तपत्रे ही सर्वसामान्य जनतेच्या समस्या सत्ताधा-यांपर्यंत व प्रशासनापर्यंत पोहचवुन समस्या सोडवण्याचे काम करतात. वृत्तपत्रांद्वारे समाजप्रबोधन व समाजजागृतीही केली जात आहे.अनेक वृत्तपत्रांतून वाचकांचे मनोरंजनही केले जात आहे.वृत्तपत्रे ही सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज आहे.वृत्तपत्रातला आवाज हा कधीच दाबला जाऊ शकत नाही.वृत्तपत्रातील बातम्यांच्या परिणामामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला अनेक प्रकरणांत न्याय मिळण्यास मदत झाली आहे.अशी प्रतिक्रिया सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स तथा आदिवासी न्यूजचे संपादक यांनी दिली.
यावेळी दैनिक लोकमतचे पत्रकार शिवाजी गोरे,रत्नागिरी टाईम्सचे यशवंत कांबळे,पुढारीचे प्रविण शिंदे,आदिवासी न्यूजचे सुशिलकुमार पावरा व सागर गोसावी तसेच संघर्ष करियर अकाडमीचे काही विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments